Raj Thackeray Khed Rally: कोकणातील जमिनी हडपणे, त्यातून बक्कळ पैसा कमवणं इतकंच येथील लोकप्रतिनिधींचे उद्दिष्ट आहे हे विसरू नका. माझी कोकणवासीयांना हात जोडून विनंती आहे की तुम्हाला फसवणाऱ्या ह्या लोकांना एकदा धडा शिकवा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरीमधील खेडमधील सभेत केले. राज यांनी कोकणी माणसाला साद घालत रिफायनरी गोव्यात का होत नाहीत? अशी विचारणा केली. कोकण ही प्रतिभावंतांची भूमी आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या भारतरत्नांपैकी सहा भारतरत्न ही कोकणातून आहे. इतक्या प्रतिभावान कोकणी माणसाला काय झालं आहे? अशी विचारणाही त्यांनी केली. 


दाभोळ प्रकल्प असो, जैतापूर असो, नाणार आणि बारसू असो इथल्या जमिनी अमराठी लोकांनी घेतल्या आणि अव्वाच्यासव्वा भावाला सरकारला विकल्या. तो गब्बर श्रीमंत झाला आणि माझा कोकणी माणूस तसाच राहिला. याचं मला खूप वाईट वाटतं, राग येतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं ते पेशव्यानी पूर्ण केलं ते म्हणजे आपला भगवा झेंडा अटकेपार फडकवला म्हणजे कुठे थेट पाकिस्तानमधील अटक किल्ल्यापर्यंत फडकवला. म्हणजे काय केलं तर जमीन ताब्यात घेतली. थोडक्यात जमिनीचं महत्व कमी लेखू नका.


शिवसेनेची रिफायनरीसाठी भूमिका नक्की काय आहे? 


राज म्हणाले की, शिवसेनेची भूमिका नक्की आहे आहे रिफायनरीबाबत? खासदार म्हणतात होणार नाही, पक्ष नसलेल्या पक्षाचे प्रमुख आता म्हणतात की लोकांच्या भावना असतील तसं होईल. मग बाळासाहेबांच्या स्मारकासाठी मुंबईचा महापौर बंगला हडपलात तेव्हा जनतेला विचारलंत? शिवसेनेची रिफायनरीसाठी भूमिका नक्की काय आहे? अशी विचारणा राज यांनी केली. 


बारसूमध्ये युनेस्कोला कातळशिल्प सापडली


राज ठाकरे यांनी सांगितले की, कातळशिल्पांच्या आसपास 3 किमीपर्यंत कोणताही विकास प्रकल्प करता येणार नाही. बारसूच्या रिफायनरी साईटच्या परिसरात कातळशिल्प आहेत, म्हणजे इथे रिफायनरी होऊच शकत नाही. त्यामुळे माझी कोकणातील बांधवाना विनंती आहे की तुम्ही जमीन विकू नका. बारसूमध्ये युनेस्कोला कातळशिल्प सापडली आहेत. युनेस्को जगभरातील अनेक हेरिटेज वास्तूंच जतन करते. आता आपल्याकडे कातळशिल्प सापडली आहेत त्यामुळे अशा हेरिटेज वास्तूच्या आसपास कोणताही मोठा प्रकल्प किंवा युनेस्कोच्या परवानगीशिवाय मोठं बांधकाम करता येत नाही. 


कोकणवासियांनो आता तरी जागे व्हा


लोकप्रतिनधींना तुमच्याबद्दल काहीही वाटत नाही, हे विसरू नका. कोकणवासियांनो आता तरी जागे व्हा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते की आपले शत्रू समुद्रमार्गाने येतील. त्यामुळे समुद्रावर डोळ्यात तेल घालून नजर ठेवा. पण आपण दुर्लक्ष केलं. 26/11 चा अतिरेकी हल्ला करणारे अतिरेकी समुद्र मार्गाने आले. 1992 च्या बॉम्बस्फोटात वापरलेलं आरडीएक्स पण समुद्र मार्गाने आलं होतं. पण आपण महाराजांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केलं आहे. 


म्हणून राजीनामा मागे घेतला असणार


राज ठाकरे यांनी अजित पवारांनाही सभेतून टोला लगावला. ते म्हणाले, की माझं असं मत आहे की शरद पवारांना राजीनामा द्यायचा होता पण राजीनामा दिल्यानंतर अजित पवार ज्या पद्धतीने अरेरावी करत होते ते पाहून पवार साहेबांच्या मनात विचार आला असणार की राजीनाम्याची घोषणा केली तर हा इतका उर्मट वागतोय तर खरंच राजीनामा दिला तर कसा वागेल, म्हणून राजीनामा मागे घेतला असणार. 


इतर महत्वाच्या बातम्या