Raj Thackeray in Jalna : जालना येथे सुरु असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भेट दिली. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, "राजकारण्यांच्या नादी लागू नका हे मी आधीच सांगितले आहे. कायदेशीर बाजू देखील समजून घेतल्या पाहिजे. जालना येथील घटनेत पोलिसांना दोष देऊ नका, कारण त्यांना आदेश देणारे दोषी आहेत. सत्तेत नसतांना मोर्चे काढतात आणि सत्तेत आल्यावर गोळ्या झाडल्या जात आहे. फडणवीस म्हणतात राजकारण करू नका, पण फडणवीस विरोधात असते तर त्यांनी काय केले असते? मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, हे मी आधीच सांगितले होते. मला या नेत्यांप्रमाणे खोटे बोलता येणार नाही. मी मुख्यंमत्री यांची भेट घेणार आहे," असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

  


काय म्हणाले राज ठाकरे? 


राज्यभरात जेव्हा मोर्चे निघत होते त्यावेळी मी सांगितले होत की, आरक्षण मिळणार नाही. पोलीसांना दोष देऊ नका त्यांना आदेश कोणी दिले, त्यांना दोष दिला पाहिजे. समुद्रात एवढा मोठा पुतळा शक्य नाही हे देखील मी सांगितले. त्यामुळे खरं तर गडकिल्ले हे आपलं स्मारक आहेत. आपल्या पुढच्या पिढीला इतिहास दाखवता येईल. ज्या लोकांनी काठ्या मारल्या त्या सर्व लोकांना मराठवाडा बंदी करा. जोपर्यंत माफी मागत नाही. फडणवीस म्हणतात की, राजकारण करू नका, पण तुम्ही विरोधात असता तर काय केले असते. मी मुख्यमंत्री याना भेटेल आणि त्यांना हा सर्व विषय सांगेल, असे राज ठाकरे म्हणाले.


राज ठाकरेंचा ताफा अडवला  


जालना येथील अंतरवाली सराटी गावात सुरु असलेल्या आंदोलकांची भेट घेण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे पोहचले आहेत. मात्र, औरंगाबादहून निघालेल्या राज ठाकरेंचा ताफा ठिकठिकाणी आंदोलकांनी अडवून मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. यावेळी राज ठाकरे यांनी देखील गाडीतून उतरून आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्यासोबत संवाद साधला. तर आपली भूमिका मी जालना येथील आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन स्पष्ट करणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत. 


औरंगाबाद विमानतळ येथून राज ठाकरे जालन्याच्या दिशेने निघाल्यावर सर्वात आधी केंब्रिज चौक येथे मराठा समाजातर्फे रास्ता रोको सुरू असताना त्यांचा ताफा थांबला. मात्र, उपस्थित आंदोलकांनी राज ठाकरेंच्या ताफ्याला रस्ता मोकळा करून दिला. त्यामुळे ताफा पुन्हा जालना जिल्ह्याच्या दिशेने निघाला. पुढे राज ठाकरे यांचा ताफा आडुळ जवळील ठापटी तांडा येथे सुरू असलेल्या रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांनी अडवला. दरम्यान या ठिकाणी राज ठाकरे यांनी गाडीतून उतरून आंदोलकांची भेट घेतली. तेव्हा तेथील आंदोलकांनी राज ठाकरेंना आपली  भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. मात्र, आपण जालना येथे भूमिका स्पष्ट करणार असल्याचे राज म्हणाले. त्यानंतर आंदोलकांनी त्यांना रस्ता मोकळा करून दिला. 


इतर महत्वाचा बातम्या : 


जालना घटनेच्या निषेधार्थ आज औरंगाबाद जिल्ह्यात बंदची हाक; MIM सह अनेक राजकीय पक्षांचा पाठिंबा