मुंबई: मुंबईसह राज्यातील विविध भागात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. मुंबई तर दोन दिवस पावसाने जोर धरला आहे. काल दिवसभरत येऊन-जाऊन असलेल्या पावसाने आज पहाटेपासून जोरदार बरसायला सुरुवात केली आहे.
मुंबईतील लालबाग, परळ, दादरसह दक्षिण मुंबईत तसंच अंधेरी, जोगेश्वरी, बोरिवली, ठाणे, विक्रोळी, कुर्ला, तिकडे नवी मुंबई पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. पावसामुळे रस्ते वाहतुकीचा वेग मंदावला आहे. मात्र लोकल रेल्वे सध्या तरी सुरळीत आहेत.
हवामानाचा अंदाज
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस होतोय. यामुळे बऱ्याच ठिकाणी पूरस्थितीही निर्माण झाली. नंदूरबारमध्ये जोरदार पावसामध्ये 6 जण बेपत्ता झाल्याची माहिती आहे. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. खरिपातील बहुतांश पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहेत. तेव्हा जोरदार पावसामुळे शेतात पाणी साचलं असल्यास, अतिरिक्त पाणी काढून टाकण्याचा सल्ला तज्ञ देत आहेत.
राज्यभरात पाऊस सक्रीय
राज्यभरात सध्या पाऊस चांगलाच सक्रिय झाला आहे. पावसामुळं विदर्भातील हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसानं चांगलाच जोर धरला आहे.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील धरणक्षेत्रांत जोरदार पाऊस सुरु आहे. नदीकाठच्या गावांना त्यामुळं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान आजही राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळं राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे 7000 क्यू सेक्स प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात होत आहे. हे पाणी पंचगंगा नदीत येणार असल्याने नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे. धरणातून पाणी सोडल्यामुळं पाडळी पुलावर पाणी आलं आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 52 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
कोयना भरलं, कृष्णेची पाणी पातळी वाढली
कोयना धरणातून मागील दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कृष्णा नदी सध्या पात्राबाहेर गेली असून सांगलीत पाण्याची पातळी 23 फुटावर पोचली आहे.
दुसरीकडे चांदोली धरणातून देखील पाण्याचा विसर्ग वाढवल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीतदेखील मोठी वाढ झाली आहे. ही नदीदेखील पात्राबाहेर गेली आहे. त्यामुळे सध्या कृष्णा आणि वारणा या दोन्ही नदीकाठी राहणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जर कोयना धरणातून आणखी पाणी सोडण्यात आले आणि जर नदी परिसरात पाऊस वाढला तर कृष्णा नदीला पूर येण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
भंडारदार, निळवंडे ओव्हरफ्लो
अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरापाठोपाठ निळवंडे धरणही ओव्हरफ्लो झाले आहे. 8300 टीएमसी पाणी साठा असलेल्या निळवंडे धरणाचा साठा 85 टक्क्यांपर्यंत गेल्यानं, तांत्रिक दृष्टया धरण भरल्याचं जाहीर करण्यात आलं. निळवंडे धरणातून सध्या साडेसात हजार क्युसेक वेगाने पाणी प्रवरा नदित सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिकमध्ये पाऊस
नाशिक जिल्हयात शनिवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे कसमा पट्ट्यातील अनेक धरणं भरुन वाहू लागल्याने, गिरणा आणि मोसम नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना तसेच मालेगाव मधील नदी काठच्या रहिवाशांना सर्तकतेचा इशारा दिला आहे.
सहस्त्रकुंड धबधबा
विदर्भाचा नायगारा म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील सहस्त्रकुंड धबधब्याची सर्वत्र ओळख आहे. गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे पैनगंगा नदीवरील हा धबधबा सध्या ओसंडून वाहत आहे. यवतमाळ - नांदेड सीमेवर उमरखेडपासून साधारण 40 किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे.
चंद्रपुरात शेतीचं नुकसान
गेल्या २ दिवसात चंद्रपुरात आलेल्या पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील वर्धा, पैनगंगा, इरई आणि झरपट या नद्यांचं पाणी शेतात शिरल्याने जिल्ह्यातील हजारो एकर शेती पाण्याखाली गेली होती. पुराचं पाणी आज ओसरल्यावर शेतीचं अतोनात नुकसान झाल्याचं चित्र पुढे येत आहे.
पुरामुळे शेतांमध्ये सर्वत्र चिखल साचल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, मिरची आणि भाजीपिकांचं या पुरामध्ये मोठं नुकसान झालं आहे.
नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या गोंडपिंपरी, कोरपना, राजुरा, बल्लारपूर आणि चंद्रपूर तालुक्यांना या पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. या तालुक्यांमधील अंतरगाव, मार्डा, सकमुर, पोडसा, वेडगाव, सोनापूर, शिवनी आणि नंदीवर्धन सारख्या गावांमधील पिकांना पुराचा मोठा फटका बसला आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांनी सरकारकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
गडचोरील जोरदार पाऊस
गडचिरोलीतही जोरदार पावसामुळे जवळपास शंभर गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला होता तो आता पूर्ववत झाला आहे. मात्र तरीही पावसामुळे अजूनही जनजीवन विस्कळीत झालं आहे.
वाशिममध्ये जनजीवन विस्कळीत
वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. या पावसाने सर्वात मोठा फटका बसला तो मानोरा तालुक्याला. याठिकाणी तब्बल 52 जनावरे वाहून गेली तर 10 हजार हेक्टरच्या जवळपास जमीन खरडून गेल्याचा प्राथमिक अहवाल आहे.
शिवाय वापटा गावातील उंडाळा तलाव फुटल्याने आसपासची जमीन अक्षरश: खरडून गेली.सोबतच विहीर सुद्धा भुईसपाट झालेली पाहायला मिळाली.