मुंबई : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातल्या ओंकारेश्वर पुलावर दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या हत्येच्या निषेधार्थ आज राज्यात विविध ठिकाणी मोर्चांचं आयोजन करण्यात आलं आहे.


दोनच दिवसांपूर्वी दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी सचिन अंदुरेला अटक करण्यात आली आहे. याशिवाय आधीच सीबीआयच्या अटकेत असलेला वीरेंद्र तावडे हाच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचा दावा सीबीआयने न्यायालयात केला आहे.

सचिन अंदुरेला अटक

नालासोपाऱ्यातील स्फोटक प्रकरणाचा तपास करताना एटीएसला डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचे धागेदोरे मिळाले. स्फोटक प्रकरणात वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर या तिघांना अटक करण्यात आली. यातील शरद कळसकरच्या चौकशीतून सचिन अंदुरेचं नाव समोर आलं. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे दोघे मित्र आहेत.

सचिन अंदुरेचा गुन्ह्यातील सहभाग लक्षात आल्यानंतर एटीएसने त्याला अटक करुन सीबीआयकडे सोपवलं. सचिन अंदुरेनेच डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा दावा सीबीआयने केला आहे.

काल सचिन अंदुरेला पुण्यातील कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने सचिन अंदुरेला 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली.

सचिन अंदुरे कोण आहे?

सचिन अंदुरे नालासोपारा स्फोटक प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याचा मित्र आहे. सचिनचे आई-वडील हयात नाहीत. पत्नी आणि एक मुलगी असा त्याचा परिवार आहे. सचिन औरंगाबादमधील राजबाजार कुवारफल्ली भागात भाड्याच्या घरात गेल्या 10 महिन्यांपासून राहत होता.  निराला बाजार भागात कपड्याच्या दुकानात सचिन काम करतो. 14 ऑगस्ट रोजी एटीएसने सचिन अंदुरेला निरालाबाजार येथून अटक केली. ज्या दिवशी अटक केली, त्या दिवसापासून त्याच्या घराला कुलूप आहे.

“वीरेंद्र तावडेच दाभोलकरांच्या हत्येचा मास्टरमाईंड”

20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर ज्या दोन मारेकऱ्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या, त्यातील एक सचिन अंदुरे आहे. हा संपूर्ण कट अगोदरच अटकेत असलेल्या वीरेंद्रसिंह तावडे याने रचला आहे. त्यामुळे सचिन अंदुरेची पोलीस कोठडी आवश्यक आहे, असा अर्ज सीबीआयने कोर्टात केला.

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या सचिन अंदुरेला अटक करण्यात आली आहे. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या सचिन अंदुरेची कोठडी मिळवण्यासाठी सीबीआयने सादर केलेल्या रिमांडमध्ये संपूर्ण कटाचा उलगडा करण्यासाठी चौकशी आवश्यक असल्याचं म्हटलंय.

जवाब दो कॅम्पेन

अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि राज्यभरातील विवेकवादी लोकांकडून फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप डीपी यांसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनही सराकरला जाब विचारला जात आहे. डॉ. दाभोलकरांच्या हत्येचे सूत्रधार कधी गजाआड होणार, असा सवाल करत सोशल मीडियावरुन ‘जवाब दो’ कॅम्पेन चालवले जात आहे.