मुंबई : नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) आणखी एकाला जालन्यातून अटक केली. कट्टर हिंदूत्ववादी अशी ओळख असलेल्या श्रीकांत पांगारकरला एटीएसने अटक केली.


जालना शहरातील महसूल कॉलनीमध्ये राहणारा श्रीकांत पांगारकर मूळचा शिवसेनेशी जोडलेला कार्यकर्ता होता. पक्ष कार्यकर्ता म्हणून ओळख असताना 2001 साली शिवसेनेने त्याला भाग्य नगर भागातून तिकीट दिलं, त्यावेळी तो या तिकिटावर निवडून आला.

यानंतर 2006 साली पुन्हा तो या भागातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आला. 2011 साली पक्षाशी फारसा सक्रिय नसल्याच्या कारणावरून त्याला पक्षाचं तिकीट देण्यात आलं नाही. या काळात त्याचा हिंदू जन जागृती संघटनेशी संबंध आला. यानंतर तो या संघटनेचा सक्रिय सदस्य म्हणूनच कार्यरत होता. आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा पांगारकरचा परिवार आहे.

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी आतापर्यंत कुणाकुणाला अटक?

एटीएसने पांगारकरला काल औरंगाबादमध्ये ताब्यात घेऊन जालन्यात चौकशीसाठी नेलं होतं. नालासोपारा स्फोटकांच्या चौकशीनंतर एटीएसने अखेर त्याला अटक केली. नालासोपारा स्फोटक प्रकरणी एटीएसची ही आतापर्यंतची चौथी अटक आहे.

नालासोपारामध्ये सापडलेल्या शस्त्रसाठ्याप्रकरणी शरद कळसकर, वैभव राऊत आणि सुधन्वा गोंधळेकर या तिघांना शनिवारी आणखी दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. शनिवारी या तिघांना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायाधीश विनोद पाडळकर यांनी तिन्ही आरोपींना 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

हिंदू दहशतवाद पसरवत असल्याच्या संशयाखाली अटक करण्यात आलेल्या या तिन्ही आरोपींना या संपूर्ण प्रकरणाच्या गंभीरतेची कल्पना होती, हे आत्तापर्यंतच्या तपासातून समोर आलंय. त्यांच्याकडून आत्तापर्यंत हस्तगत करण्यात आलेला शस्त्रसाठा आणि इतर साहित्य हे याप्रकरणी अधिक खोलात तपास करण्याची गरज असल्याचं सिद्ध करण्यास पुरेसं आहे, असं महत्त्वपूर्ण निरीक्षण यावेळी न्यायालयाने व्यक्त केलं.

प्रकरण काय आहे?

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने गुरुवारी रात्री नालासोपाऱ्यातील वैभव राऊत या व्यक्तीच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केली. भांडारअळीत राहणाऱ्या वैभव राऊतच्या घरातून एटीएसने ही स्फोटकं जप्त केली. महत्त्वाचं म्हणजे वैभव राऊत हा कट्टर हिंदुत्ववादी सनातन संस्थेशी संलग्न आहे. एटीएसने गुरुवारी रात्री ही धडक कारवाई केली. या धाडीत 8 देशी बॉम्ब मिळाले. तर घरापासून काही अंतरावर असणाऱ्या त्याच्या दुकानात बॉम्ब बनविण्यासाठी लागणारी सामुग्रीही मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामध्ये गन पावडर आणि डिटोनेटर यांचा समावेश आहे. या सामुग्रीमध्ये 2 डझन पेक्षा जास्त देशी बॉम्ब बनविले जातात.

सनातन संस्थेशी संबंधित असलेल्या वैभव राऊतच्या घरी इतकी मोठी स्फोटकं कशासाठी एकत्र केली होती, याचा तपास आता एटीएस करत आहे.

एटीएसला वैभव राऊतकडे स्फोटकं असल्याची टिप मिळाली होती. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून एटीएसने सापळा रचला होता. गुरुवारी रात्री खात्री करुन वैभव राऊतच्या घरी धाड टाकली असता, एटीएसला स्फोटकांचा साठा आढळला. पोलिसांनी वैभवाला ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरु केली आहे.

एटीएसने या कारवाईनंतर डॉग स्कॉड, फॉरेन्सिक टीम यांनाही बोलावून तपासणीही केली. गुरुवारी रात्रभर एटीएसच्या अधिकाऱ्यांनी वैभव राऊतच्या घरी सर्च ओपॅरेशन केलं. मिळालेले बॉम्ब, त्यासाठी लागणारी सामुग्री ही कुठून आणली, हे बॉम्ब कशासाठी बनविले जात होते, याचा सर्व तपास आता सुरु आहे.

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचे धागेदोरे

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी अटकेत असलेल्यांची चौकशी करत असताना पाच वर्षांपूर्वीच्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचे धागेदोरेही हाती लागले.

नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास करताना एटीएसला डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचे धागेदोरे मिळाले. शरद कळसकरच्या चौकशीतून सचिन अंदुरेचं नाव समोर आलं. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे दोघे मित्र आहेत. सीबीआयने सचिन अंदुरेला अटक केली आहे. सचिन अंदुरेचा गुन्ह्यातील सहभाग लक्षात आल्यानंतर एटीएसने त्याला अटक करुन सीबीआयकडे सोपवलं आहे. सचिन अंदुरेनेच डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा दावा सीबीआयने केला आहे.

नालासोपारा स्फोटक प्रकरणात एटीएसच्या ताब्यात असलेल्या तिघांपैकी (वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर) शरद कळसकरने डॉ. दाभोलकरांच्या हत्येत सहभागाची कबुली दिली आहे, अशी माहिती एटीएसकडून देण्यात आली.