मुंबई: महाराष्ट्र चिंब झाला आहे. जागोजागी मुसळधार पाऊस सुरु आहे. फक्त जुलैच्या 11 दिवसातच 300 तालुक्यांमध्ये 100 टक्के पाऊस झाला आहे. नद्या पात्राबाहेर आहेत. धरणं काठोकाठ भरली आहेत, चित्र सुखावणारं आहे.
पण मग डिसेंबर महिना उजाडताच टीव्ही आणि वृत्तपत्रांमध्ये दुष्काळाच्या आणि पाणी टंचाईच्या बातम्या का दाखवाव्या लागतात?.. उत्तर सोपं आहे... आपण वरुणराजानं भरभरून दिलेल्या पावसाच्या पाण्याचा थेंब साठवत नाही... त्या थेंबांची आपल्याला कदर नाही... पण जेव्हा घशाला कोरड पडते, तेव्हा मात्र आपण पाण्यासाठी दाहीदिशा भटकतो.
महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाचा थेंब अन् थेंब वाचवला, तर दुष्काळाचा लवलेश आपल्याला दिसणार नाही.. आणि म्हणूनच पाणी फाऊंडेशनची वॉटर कप स्पर्धा, जलयुक्त शिवार, नाम फाऊंडेशन यासारख्या अनेक जलसंवर्धनाच्या योजना प्रत्येक गावात होण्याची गरज आहे.
नद्यांमधून वाहून जाऊन समुद्रात जाणारं पाणी जमिनीत मुरवणं गरजेचं आहे, धावत्या पाण्याला चालवणं शिकवायला हवं, चालणाऱ्या पाण्याला थांबवायला हवं... आणि थांबलेल्या पाण्याला मुरवायला हवं.... येत्या काळात तसं झालं... तर डिसेंबरमध्येच पाणी आटून भेगाळलेल्या जमिनी महाराष्ट्रात दिसणार नाहीत.
महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस
गेल्या 11 दिवसात राज्यभरात सर्वदूर पावसानं दमदार हजेरी लावल्याचं चित्र आहे. यामुळं कागदावर तरी महाराष्ट्र हिरवा दिसतोय. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यभरातील 297 तालुक्यात 1 जुलै ते 11 जुलैच्या दरम्यान 100 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला आहे. यात संपूर्ण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागाचा समावेश आहे. तर 24 तालुके असे आहे कि जिथं सरासरी इतका किंवा सरासरीच्या 75 टक्के पाऊस झाला आहे.
राज्यातील फक्त 32 तालुक्यात सरासरीच्या 50 टक्के किंवा त्यापेक्षा कमी पाऊस झाल्याचं चित्र आहे. मराठवाड्यातील काही तालुके आणि नंदुरबार जिल्ह्यातील 2 तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळं राज्याच्या धरणातील एकूण पाणी पातळीतही वाढ झाली आहे. राज्यातील धरणात आतापर्यंत 26 टक्के पाणी साठा जमा झालाय.