मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. मात्र ही परिस्थिती उद्यापासून बदलण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेनं उद्यापासून राज्यात पाऊस कमी होण्याचा अंदाज वर्तवला आहे.


 

राज्यात सर्वदूर चांगला पाऊस झाल्याने आनंदाचं वातावरण आहे. त्यातच जवळजवळ सर्वच नद्या दुथडी भरुन वाहात असल्याचं चित्र आहे. धरणांच्या पाण्यामध्येही चांगली वाढ झालीय. त्यामुळे पाऊस कमी झाल्याने शेतीच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे.

 

पंचगंगेचं कोल्हापूर शहरावर आक्रमण


पंचगंगा नदीनं कोल्हापूर शहरावर कसं आक्रमण केलं आहे... ते दाखवणारा हा व्हिडिओ माझाच्या एका प्रेक्षकाने कोल्हापुरातल्या बापट कॅम्पमधून पाठवला आहे.

 

कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसानं पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांड़लीय. पंचगंगा पात्र सोडून वाहात असल्याने कोल्हापुरात गंभीर पूरस्थिती निर्माण झालीय. शहरातल्या कसबा बावडा, बापट कॅम्प या भागांमध्ये पुराचं पाणी घुसलं असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. पंचगंगेच्या लगत असलेली ऊसशेती पाण्याखाली गेली असून, पाण्याची पातळी आणखी वाढल्यास, शहरातल्या अनेक सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.



जिल्ह्यातील राधानगरी, शाहुवाडी आणि गगनबावडा परिसरात पूरस्थिती गंभीर आहे. जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

पुण्याहून एनडीआरएफचं पथक कोल्हापुरात

कोल्हापुरातील गंभीर पूरस्थितीचा सामना करण्यासाठी पुण्याहून एऩडीआरएफचं पथक कोल्हापुरात दाखल झालंय. 40 जवानांसह 6 बोटी या पथकात आहेत. जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये पूरामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा सामना हे पथक सामना करणार आहे.

 

दरम्यान, पाण्यात अडकून पडलेल्या काही नागरिकांची या पथकानं सुटका केली आहे.

 

कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे डोंगर खचल्याने रस्ता वाहून गेलाय. चाफेवाडी ते धुमाळवाडी आणि बेरकळवाडी रस्त्यावर हा प्रकार घडला आहे. रस्ता खचल्याने या गावांचा एकमेकांशी असलेला संपर्क तुटलाय. डोंगर खचल्य़ाचा प्रकार घडल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

 

नृसिंह मंदिर पाण्याखाली


तर दुसरीकडे अनेक भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं नरसोबाचंवाडीचं दत्त मंदिर पाण्याखाली गेलं आहे. काल सकाळी दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा पार पडला. त्यानंतर सातारा-सांगली जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. ज्यामुळे हे मंदिर पाण्याखाली गेलं आहे.



कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास सर्व नद्यांना पूर आलाय..खबरदारीचा उपाय म्हणून कोकणातून येणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली असून. जिल्हा प्रशासनाला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

गडहिंग्लंजमध्ये धुवाँधार


कोल्हापूर शहरातच नाही, तर जिल्ह्याच्या दक्षिण भागातही सुरु असलेल्या पावसाच्या थैमानाने हाहाकार उडाला आहे.

 

महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या आंबोलीत उगम पावणाऱ्या हिरण्यकेशीने धोक्याची पातळी ओलांडली असून, गडहिंग्लजच्या भडगाव पुलावर पाणी आल्यानं महाराष्ट्राचं दक्षिणेचं टोक असलेल्या चंदगड तालुक्याशी संपर्क तुटला आहे.

 

इतकंच नाही, तर नदीवरचे सारे बंधारे हे पाण्याखाली गेल्यानं अनेक गावं संपर्कहीन झाली आहे.



आंबोलीत झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी हे विविध नद्यांमधून हिरण्यकेशी नदीत दाखल होते. त्यामुळे गडहिंग्लज तालुक्यातली नदीकाठची शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे.

 

पाटण - कोयना रस्ता वाहून गेला


एकीकडे राज्यातील पावसानं पाण्याची चिंता मिटवली आहे. तर दुसरीकडे साताऱ्यातील मुसळधार पावसानं स्थानिक प्रशासनाचं पितळ उघडं पडलं आहे. पाटण ते कोयना परिसरापर्यंत जाणारे रस्ते अक्षरश: पावसानं वाहून गेलेत. तसंच नव्यानं बांधलेले पुलही होत्याचे नव्हते झालेत.

 

एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे  भल्यामोठ्या खड्ड्यांचे रस्ते अशा कात्रीतून सुटका कशी करावी असा यक्षप्रश्न सातारकरांना पडला आहे. पायी रस्ता तुडवत जाणाऱ्या शाळकरी चिमुरड्यांना तर अशा चाळण झालेल्या रस्त्यावरुन जाताना अक्षरश: कसरत करावी लागत आहे.

 

सांगलीत चांगला पाऊस

 

सांगली शहरातही चांगला पाऊस आहे, त्यातच चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सांगली शहरातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. शहरातील अनेक महत्वाच्या रस्त्यांवर पाणी साचलं असून काकानगर, मगरमच्छ कॉलनी या भागातून 18 कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

 

तर बामणी गावात ओढ्याला आलेल्या पुरामुळे सुमारे दोन हजार लोकांचा अन्य गावांशी संपर्क तुटला आहे. पुढचे काही दिवस हा पाऊस सुरु राहिल्यास जनजीवन अजून विस्कळीत होईलं असं जिल्हा प्रशासनाचं म्हणणं आहे.

 

रत्नागिरीत नदी - नाले तुडूंब

 

रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे.. नदी नाले तुडुंब भरून वाहू लागल्यानं रत्नागिरीतलं जनजीवन ठप्प झालं आहे. रत्नागिरीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसानं जोर धरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.

 

रायगड जिल्ह्यातही पावसाचा कहर

 

रायगड जिल्ह्यातही पावसाचा कहर सुरुच आहे. महाड तालुक्यातील वाळण ते वाघेरी मार्गावर दरड कोसळल्याने या दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. काल संध्याकाळी सात वाजल्याच्या दरम्यान ही घटना घडल्याचं कळतंय. दरड कोसळल्याची माहिती कळताच तहसिलदार आणि बांधकाम खात्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. सध्या ही दरड हटवण्याचं काम सुरु असून याला अजून किती वेळ लागेल हे निश्चित सांगता येणार नसल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

 

पुण्यातलं खडकवासला धरण भरलंय

चांगल्या पावसानं पुण्यातलं खडकवासला धरण पूर्ण भरलं आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आलाय. मुठा नदीच्या पाणीपातळीत या पाण्यामुळे मोठी वाढ झाली आहे.