कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात हायअलर्ट जारी करण्यात आले आहे.


 



 

6 बोटींसह एनडीआरएफचे 40 जवान कोल्हापुरात दाखल 
राधानगरी, शाहुवाडी, गगनबावडा परिसरात पूरपरिस्थिती गंभीर झाली आहे. जवळपास 80 गावांशी संपर्क तुटल्याची माहिती मिळते आहे. एकूण 72 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पुण्याहून एनडीआरएफच्या 40 जवानांचं पथक 6 बोटींसह कोल्हापुरात दाखल झालं आहे.

 



 

नरसोबाच्या वाडीचं  प्रसिद्ध दत्त मंदिर पाण्याखाली

 

अनेक भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं नरसोबाच्या वाडीचं दत्त मंदिर पाण्याखाली गेलंय. काल सकाळी दत्त मंदिरात दक्षिण द्वार सोहळा पार पडला. त्यानंतर सातारा-सांगली जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे, ज्यामुळे हे मंदिर पाण्याखाली गेलं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास सर्व नद्यांना पूर आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोकणातून येणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली असून, जिल्हा प्रशासनाला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.