उस्मानाबाद : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. पहिला लॉकडाऊन सुरु झाल्यापासून ट्रेन बंद झाल्या आणि अनेक जण अडकून पडले. या अडकलेल्या लोकांना आपापल्या घरी पोहोचवण्यासाठी विशेष जनसाधारण विशेष ट्रेन सुरु करण्यात येणार आहेत. 13 एप्रिल रोजी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये विविध ठिकाणी अडकलेले लोक, स्थलांतरित मजूर यांना आपापल्या निश्चित स्थळी पोहोचवण्यासाठी जनसाधारण विशेष ट्रेन सुरु करण्याचं ठरवण्यात आलं.



दक्षिण-मध्य रेल्वेचं स्पष्टीकरण


मात्र अशी कुठलीही विशेष ट्रेन चालवली जाणार नसल्याचं दक्षिण-मध्य रेल्वेने स्पष्ट केलं आहे. हे पत्र रेल्वेचा अंतर्गत व्यवहार होता. मात्र सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल झालं आहे.


लॉकडाऊनमुळे अडकलेल्या लोकांचे, स्थलांतरित मजुरांचे अतिशय हाल होत आहे. त्यातच महाराष्ट्रातील लॉकडाऊन 16 दिवस वाढल्याने हातावर पोट असणारे मजूर चिंताग्रस्त आहेत. काम नाही तर दाम नाही. दाम नाही तर रोटी नाही, अशी अवस्था त्यांची झाली आहे. काही ठिकाणी लोकांनी मिळेल त्या मार्गाने प्रवास केला. काहींनी चालत, बाईकवर, कंटेनरमधून, दुधाच्या टँकरमधून आपापल्या घरी जाण्याचा प्रयत्न केला. ट्रेन बंद झाल्याने मुंबईतील कुर्ला टर्मिनसमवर अनेक प्रवासी अडकले. तर दिल्लीत बस स्टॅण्डवर तुफान गर्दी उसळली होती. त्यामुळे कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अडकलेल्या प्रवासी आणि मजुरांचं रेस्क्यू ऑपरेशन केलं जाणार आहे. यासाठी रेल्वेची मदत घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातून मध्य आणि दक्षिण-मध्य विभागातून काही गाड्यांमधून मजुरांना आपापल्या गावाला पाठवण्यात येईल.


महाराष्ट्रातून कोणत्या विभागातून रेल्वे धावणार?
महाराष्ट्रातील मध्य रेल्वे आणि दक्षिण मध्य रेल्वे या दोन विभागांचा समावेश आहे.
नांदेड विभागातून 20 गाड्या मागितल्या आहेत. औरंगाबादमधून तीन हजार मजूर पाठवणार आहेत. हे लॉकडाऊनमधील सर्वात मोठे रेस्क्यू ऑपरेशन ठरेल.


*मध्य रेल्वे विभाग*
मुंबई सीएसएमटी
पुणे विभाग (पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर)
सोलापूर (अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, मनमान, सोलापूर)
भुसावळ (भुसावळ, खांदवा, जळगाव, अकोला, अमरावती, नाशिक, इगतपुरी, नंदुरबार, धुळे)
नागपूर (वर्धा, नागपूर, चंद्रपूर, वणी)


*दक्षिण-मध्य रेल्वे विभाग*
नांदेड (नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड, हिंगोली, वाशिम, अकोला, मुखेड)


*कसा असेल प्रवास?*
यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयांकडून माहिती संकलित करण्यात आली आहे. समजा लखनौला जाणारे मजूर असतील तर ते मजूर त्या डब्यात बसवले जातील, त्या डब्यांना बाहेरुन कुलूप लावले जाईल आणि हा डबा थेट लखनौला उघडेल, खिडक्या उघड्या असतील. मात्र आतमधून बाहेर पडता येणार नाही.


(ही बातमी सकाळी 9 वाजता प्रसारित झालेल्या बुलेटिनमधील बातमीचं टेक्स्ट व्हर्जन आहे.)

India Lockdown | शहरात अडकून पडलेल्या मजुरांसाठी ट्रेन सुरु होणार?