Raigad Suspicious Boat Case : रायगड (Raigad) संशयित बोट प्रकरणात मुंबईत आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, बोटिच्या तपासात तीन एके-47 आणि काडतुसं सापडल्यानंतर बोटीवर 2 चॉपरही आढळले आहेत. एटीएस आणि एनआयएकडून तपास सुरु करण्यात आला आहे. 


रायगड संशयित बोट प्रकरणी ATS ने मोठी माहिती दिली आहे. बोटीमध्ये AK47 नंतर आणखी नवी शस्त्रं सापडली आहेत.. एटीसला बोटीमध्ये 2 तलवार आणि 2 चॉपरही मिळाले आहेत.. एटीएसने या बोटीची तपासणी केल्यानंतर या प्रकरणी मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नेमकं प्रकरण काय?


गुरुवारी सकाळी राज्यातील रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर-श्रीवर्धन किनारपट्टीवर 16 मीटर लांबीची एक संशयास्पद बोट सापडली होती, ज्यावर तीन एके-47 रायफल आणि काडतुसं सापडली होती. यानंतर संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर मुंबईसह राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणात दहशतवादाचा कोणताही पैलू नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. दहीहंडीचे कार्यक्रम आणि गणेशोत्सवाच्या तोंडावर बोटीवर शस्त्रं सापडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र या प्रकरणात कोणताही दहशतवादी संबंध सापडला नसल्याचं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. या संशयास्पद बोटीचं नाव लेडी हान असून तिची मालकी एका ऑस्ट्रेलियन महिलेकडे असल्याची माहिती फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिली होती. या बोटीतून तीन 'अ‍ॅसॉल्ट रायफल', स्फोटकं आणि कागदपत्रंही जप्त करण्यात आल्याचं फडणवीस यांनी सांगितलं होतं.


संशयास्पद बोटीत आढळली होती शस्त्रास्त्र 


रायगडमधील श्रीवर्धन येथे संशयास्पद बोट आढळली. या बोटीमध्ये दोन  ते तीन एके-47 रायफल आढळल्या आहेत. त्याशिवाय 225 राउंड्स गोळ्याही त्या बोटीमध्ये मिळाल्या. त्याशिवाय हरिहरेश्वर येथे एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळून आले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.


हरिहरेश्वरच्या समुद्र किनारी आढळलेली संशयास्पद बोट (Raigad Suspected Boat) ओमान देशातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या स्पीड बोटीवर आढळून आलेल्या नावाच्या कंपनीची नोंदणी ब्रिटनमधील असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. ही स्पीड बोट ओमानजवळ समुद्रात अडकली होती. या बोटीतील व्यक्तींची ओमानजवळच सुटका करण्यात आली होती. त्यानंतर ही बोट त्याठिकाणी नांगर टाकून उभी करण्यात आली होती. त्यानंतर ही बोट समुद्रातून वाहत रायगडजवळ आली असावी अशी माहिती सूत्रांनी दिली. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :