रायगड : रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील एका बोकडाला चक्क दोन स्तन आले असून तो दूध देऊ लागला आहे. शिरसे गावातील पद्माकर देशमुख यांच्या घरचा हा बोकड चौदा महिन्यांचा असून गेल्या काही दिवसांपासून तो दूध देऊ लागला आहे.
सस्तन प्राण्यांमध्ये नर आणि मादी या दोन प्रजाती असून मादीच पिल्लांना जन्म देते. शिवाय दूध पाजून त्यांचं संगोपन करते. पण कर्जत इथे राहणाऱ्या पद्माकर देशमुख यांच्या घरचा बोकड चक्क दूध देऊ लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
शिरसे गावात राहणारे पद्माकर देशमुख हे एक शेतकरी असून पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी म्हशी, शेळ्या पाळून दुग्ध व्यवसाय करतात. गेल्या वर्षभरापूर्वी त्यांनी उस्मानाबादी बोकडाचे दोन महिन्यांचं पिल्लू खरेदी केलं आणि त्याचं नामकरण केलं 'राजा'. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून त्याला स्तन फुटण्यास सुरुवात झाली आणि दिवसेंदिवस ते मोठे होत गेले.
त्यातच, बोकडाचे वाढते स्तन पाहून शेतकऱ्याने कुतुहूल म्हणून त्यातून दूध येतं का असे पाहण्याचा प्रयत्न केला असता चक्क त्यातून दूध येऊ लागलं. हे पाहून पद्माकर यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी या घटनेची खातरजमा करण्यासाठी अनेकदा या बोकडाला आलेल्या स्तनातून दूध काढण्याचा प्रयत्न केला आणि दरवेळेस त्यातून दूध येताना आढळलं.
दरम्यान, पशु विभागीय अधिकाऱ्यांनीही या बोकडाची पाहणी केली असून त्याच्या दुधाचा नमुना फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे. तर, गेल्या महिनाभरापासून या बोकडाला स्तन आल्याची बातमी पसरली असताना, आता हा बोकड दूध देत असल्याची चर्चा कर्जतमध्ये सुरु आहे. त्यामुळे या बोकडाला पाहण्या पाहण्यासाठी गर्दी करु लागले आहेत.