Konkan News Updates: महाराष्ट्रातील राजकारणामध्ये (Maharashtra Politics) काहीसे वेगळेपण सध्या पाहावयास मिळत आहे. शिवसेनेमध्ये मोठी फूट पडून महाराष्ट्रामध्ये शिंदे आणि ठाकरे (Shinde and Thackeray Group) असे दोन गट तयार झाले आहेत. असं असलं तरी कार्यकर्त्यांची निष्ठा ही आपल्या नेत्यांप्रती आणि आपल्या पक्षाप्रती अखंड असते. असंच एक उदाहरण समोर आलं आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना मानणाऱ्या एका कट्टर शिवसैनिकाने आपल्या मुलीचं नाव 'शिवसेना' असं ठेवलं आहे.


नक्की शिवसेना कोणाची याचा निर्णय देखील अजून कोर्टाने राखून ठेवला आहे. रोज शिंदे आणि ठाकरे गटातील नेते एकमेकांवर टीका करताना दिसून येत आहेत. नुकतंच 17 नोव्हेंबर म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन या स्मृतिदिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबईमध्ये येत असतात. महाड तालुक्यातील किये - गोठवली येथील माजी उपसरपंच पांडुरंग वाडकर यांनी 17 नोव्हेंबर बाळासाहेबांच्या स्मृतिदिना दिवशीच आपल्या कन्येच्या नामकरण विधी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 


नामकरण सोहळ्याला आजूबाजूच्या हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती


यावेळी त्यांनी आपल्या कन्येचे नावच 'शिवसेना' असे ठेवून सर्वांनाच चकित केले. पांडुरंग वाडकर यांनी सांगितलं की, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे माझ्या स्वप्नात आले होते. बाळासाहेब ठाकरे यांचा मी कट्टर कार्यकर्ता असल्यामुळे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझ्या मुलीचे नाव शिवसेना असे ठेवले आहे, असे पांडुरंग वाडकर यांनी पुढे बोलताना सांगितले. या नामकरण सोहळ्याला आजूबाजूच्या हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविली होती. यापुढे लवकरच पांडुरंग वाडकर आपल्या कन्येला घेऊन मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे समजते.


पांडुरंग वाडकर हे महाड तालुक्यातील किये - गोठवली गावचे माजी उपसरपंच आहेत. शिवसेनेतून वेगळं होत एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला. त्यानंतर भाजपसोबत जात ते सत्तेत देखील आले. यानंतर अनेक कार्यकर्ते आणि महत्वाचे नेते शिंदे गटात सहभागी झाले.  पांडुरंग वाडकर यांनी मात्र ठाकरे परिवाराशी निष्ठा असल्याचं दाखवत ठाकरे यांच्यासोबतच राहणे पसंत केलं आहे. इतकेच नाही तर त्यांनी आपल्या चिमुकलीचं नाव शिवसेना ठेवलं आहे. 


ही बातमी देखील वाचा