Uddhav Thackeray : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 50 हजार सदस्य नोंदणी करण्याचे टार्गेट पदाधिकाऱ्यांना दिले आहे. प्रमुख नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी सदस्य नोंदणी करण्यास सांगितले आहे. उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीच्या संघटनात्मक तयारीबाबत चर्चा करण्यासाठी तीन जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांना बोलावले होते. मातोश्रीवर ही बैठक पार पडली.
या बैठकीला उपस्थित असलेल्या एका नेत्याने सांगितले की, त्यांना प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून आमच्या पक्षाकडे 50,000 समर्थकांची नोंदणी करण्यास सांगण्यात आले आहे. आगामी निवडणुका धनुष्यबाण चिन्हाशिवाय होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे नवीन चिन्ह मशाल लोकांपर्यंत नेण्याचे आवाहन प्रमुख नेत्यांनी केले.
स्थानिक नेत्यांकडून शिफारसी मागवल्या
या बैठकीला कोल्हापूरमधून शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे उपस्थित होते. पक्षाच्या पुनरुज्जीवनासाठी वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक नेत्यांकडून शिफारसी मागवल्या. संजय पवार यांनी सांगितले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संघटनात्मक सुधारणेवर भाष्य केले. तसेच नेत्यांना आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरू करण्याचे आवाहन केले. कोल्हापुरातील दोन्ही शिवसेना खासदार तसेच एकमेव आमदार प्रकाश आबिटकर शिंदे गटात सामील झाल्याने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेत्यांना अप्रत्यक्षपणे या जिल्ह्यांमधून लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांचा शोध घेण्याचे सांगण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला भगदाड
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाळी केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटले. जिल्ह्यातील एकमेव शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर, सहयोगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी बंडखोरी करत शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना जिवंत ठेवण्याचे काम पदाधिकारी करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात शिंदे गटाकडूनही पदाधिकारी नेमले गेले आहेत.
आदित्य ठाकरेंना उस्फूर्त प्रतिसाद
बंडखोरांच्या मतदारसंघात युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनीही ऑगस्ट महिन्यात सभा घेत जिल्हा पिंजून काढला होता. यावेळी आदित्य ठाकरे यांचे झालेले स्वागत आणि त्यांच्या सभांना मिळालेला प्रतिसाद पाहून बंडखोरांना चांगलाच धसका बसला होता. आजरा तालुक्यातही त्यांचे झालेले स्वागत बंडखोरांना विचार करायला लावणारे होते.
इतर महत्वाच्या बातम्या