कल्याण : रायगडमध्ये 2.8 रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा सौम्य धक्का बसला. या भूकंपाचे सौम्य हादरे भिवंडी, डोंबिवलीपासून कल्याण, मोहने ते टिटवाळ्यासह उल्हासनगर भागात जाणवले. अचानक बसलेल्या हादऱ्यांमुळे भयभीत झालेल्या रहिवाशांनी घराबाहेर पळ काढला.
शुक्रवारी रात्री 9 वाजून 31 मिनिटांच्या सुमारास भिवंडी, कल्याण-डोंबिवली परिसरात अचानक कंपनं आणि हादरे बसण्यास सुरुवात झाली. साधारणपणे 9 वाजून 33 मिनिटांपर्यंत म्हणजेच सुमारे 2 ते 3 मिनिटे हे हादरे जाणवल्याची माहिती नागरिकांनी दिली.
कल्याण पूर्व-पश्चिम, डोंबिवली पूर्व-पश्चिम, उल्हासनगर, भिवंडी, टिटवाळ्यासह कल्याण भिवंडी जवळील ग्रामीण भागात हे हादरे बसल्याची माहिती आहे.
अचानक बसलेल्या या गूढ हादऱ्यांनी भिवंडी, कल्याणच्या अनेक भागात नागरिक घाबरुन घराबाहेर जमा झाले. तर हादऱ्यांमुळे काही जणांच्या घरातील भांडी पडल्याची माहितीही प्रत्यक्षदर्शींनी दिली.