Rahul Gandhi : भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra)  काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. इंदूरमध्ये (Indore) बॉम्बनं उडवण्याच्या धमकीचं पत्र आलं आहे. हे इंदूरमधील एका मिठाईच्या दुकानात धमकीचं निनावी पत्र आलं आहे. दरम्यान, हे पत्र नेमकं कोणी दिलं? हे अद्याप समजलं नाही. याप्रकरणी पोलिस आणि क्राईम ब्रँचचे अधिकारी तपास करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस जुने इंदूर पोलीस स्टेशन परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करत आहेत.


दरम्यान, येत्या 24 नोव्हेंबरलाराहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा इंदूरच्या खालसा स्टेडियममध्ये विश्रांतीसाठी थांबणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांना हे धमकीचं पत्र आलं आहे. पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. सध्या राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात सुरु आहे. राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात आजच राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा दाखल झाली आहे. आज राहुल गांधी यांची शेगावमध्ये जाहीर सभा होणार आहे. 


सावरकरांबद्दल राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण तापलं


राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातलं वातावरण चांगलचं तापलं आहे.  भाजपसह मनसे आणि शिंदे गटाने राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तसेच राहुल गांधींवर जोरदार टीकाही केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज राहुल गांधींची शेगावमध्ये जाहीर सभा होणार आहे. आता या सभेत गांधी काय बोलतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. आजच्या सभेसाठी महाराष्ट्रातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.


शेगावच्या सभेत मनसे काळे झेंडे दाखवणार 


राहुल गांधी यांच्या शेगावमधील सभेत त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दिला आहे. तसेच सभा उधळून लावू असा इशाराही मनसेनं दिला आहे. त्यानंतर नागपुरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत. पोलिसांनी मनसैनीकांना 149 ची नोटीस बजावली आहे. उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


काँग्रेस नेत्यांचं प्रत्युत्तर 


भारत जोडो यात्रेला जनमताचा प्रचंड रेटा आहे. त्यामुळं मनसेच्या किरकोळ आंदोलनानं काही फरक पडणार नसल्याचे वक्तव्य काँग्रेसचे माजी मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केलं आहे. यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत असल्यानं गालबोट लावण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचे चव्हाण म्हणाले. भारत जोडो यात्रेला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. सामान्य लोक यात्रेत सामील होत आहेत. लोकांच्या व्यथा आणि अडचणी राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचत आहेत. राहुल गांधी जवळून प्रत्येकाशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत असल्याचे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले. मनसे कोण? असा उपरोधी टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी लगावला. ते आम्हाला काळे झेंडे दाखवत असतील तर आम्ही त्यांना गुलाबाचे फुल देऊ असे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मनसेच्या विरोधाची हवा काढण्याचा प्रयत्न केला. मनसेने कितीही विरोध केला तरीही यात्रा रोखता येणार नाही, हे राहुल गांधी यांनी आधीच स्पष्ट केल्याचे पटोले म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


Rahul Gandhi : राहुल गांधींची आज शेगावमध्ये जाहीर सभा, मनसे दाखवणार काळे झेंडे, नाना पटोले म्हणतात...