Ashok Chavan : भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) जनमताचा प्रचंड रेटा आहे. त्यामुळं मनसेच्या किरकोळ आंदोलनानं काही फरक पडणार नसल्याचे वक्तव्य काँग्रेसचे माजी मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केलं आहे. यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत असल्यानं गालबोट लावण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचे चव्हाण म्हणाले. आज बुलढाणा (Buldana) जिल्ह्यातील शेगावमध्ये खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत मनसेनं काळे झेंडे दाखवण्याची तयारी केली आहे. त्यांच्या या विरोध करण्याच्या भूमिकेवर अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
भारत जोडो यात्रेला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. सामान्य लोक यात्रेत सामील होत आहेत. लोकांच्या व्यथा आणि अडचणी राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचत आहेत. राहुल गांधी जवळून प्रत्येकाशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत असल्याचे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले. या यात्रेतून देशामध्ये प्रेमाचा संदेश दिला जात असल्याचे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.
विरोधकांना आंदोलन करण्याचा अधिकार, या यात्रेची इतिहासात नोंद होईल : पृथ्वीराज चव्हाण
भारत जोडो यात्रा ही भूतो न भविष्य अशी आहे. या यात्रेची देशाच्या इतिहासात नोंद होईल अशी यात्रा आहे. आज मोठी सभा होणार आहे. संबंध महारष्ट्रातून या यात्रेसाठी कार्यकर्ते आले असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. विरोधकांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल जरी झाला असला तरी कायदेशीर प्रक्रिया होईल असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
आम्ही त्यांना गुलाबाचे फुल देऊ : नाना पटोले
मनसे कोण? असा उपरोधी टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी लगावला. ते आम्हाला काळे झेंडे दाखवत असतील तर आम्ही त्यांना गुलाबाचे फुल देऊ असे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मनसेच्या विरोधाची हवा काढण्याचा प्रयत्न केला. मनसेने कितीही विरोध केला तरीही यात्रा रोखता येणार नाही, हे राहुल गांधी यांनी आधीच स्पष्ट केले आहे. यात्रा कोणीही थांबू शकणार नाही. शेगावच्या सभेसाठी काँग्रेसची मोठी तयारी झाली आहे. मोठ्या संख्येने तिथे कार्यकर्ते पोहोचणार असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. मनसे हा एक स्टंटबाज पक्ष आहे. भारत जोडो यात्रेविरोधात देखील त्यांचा एक स्टंट असल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाई जगताप यांनी व्यक्त केले.
थोड्याच वेळात यात्रा बुलढाण्यात पोहोचणार
दरम्यान, थोड्याच वेळात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेचे बुलढाणा जिल्ह्यात आगमन होणार आहे. त्यांच्या स्वागताची तयारी शेगाव तालुक्यातील वरखेड या गावी झाली आहे. जवळपास एक हजार वारकऱ्यांसोबत रिंगण सोहळ्यात राहुल गांधी सामील होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: