Eknath Khadse : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे बंडखोर आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटीला (Guwahati) जाणार असल्याची चर्चा आहे. या विषयावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना चांगलेच चिमटे काढले. मी दर तीन चार वर्षातून कामाख्या देवीच्या दर्शनाला जातो, आताही मी कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहे. परत आमचं सरकार येऊ दे, असं साकडं घालणार असल्याचं खडसेंनी सांगितलं.


40 आमदारांसाठी गुवाहाटीची आठवण ही प्रेयसीच्या आठवणीसारखी


जळगाव जिल्ह्यातील जामनेर इंथे राष्ट्रवादी काँग्रेस व्हिजेएनटी सेलच्या वतीनं कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात खडसे बोलत होते. यावेळी खडसेंनी टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. 40 बंडखोर आमदारांसाठी गुवाहाटीची आठवण ही प्रेयसीच्या आठवणीसारखी असल्याचा चिमटा देखील खडसेंनी यावेळी काढला. मुख्यमंत्री 40 आमदारांना घेऊन कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहेत. पुन्हा तेच हॉटेल, तीच झाडी, तीच डोंगर असे म्हणत खडसेंनी टोला लगावला.  


माझ्याकडे  50 खोके नाहीत, पण 50 लोकांचे आशिर्वाद आहेत 


मला पण इच्छा होते की आपण गुवाहाटीला गेलं पाहिजे असे खडसे म्हणाले. मी तसं दरवर्षी कोलकातामध्ये दर्शनाला जातो. तसेच दर तीन चार वर्षांनी मी कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला जातो असे खडसे म्हणाले. आता मलाही वाटत आहे की कामाख्या देवीच्या मंदिरामध्ये जावं आणि त्या मातेला सांगाव की 50 खोके माझ्याकडे नाहीत. पण 50 लोक मला आशिर्वाद देणारे आहेत. पुन्हा आमचं सरकार येऊदेत असेही खडसे यावेळी म्हणाले. 


जून महिन्यात राजकीय उलथा-पालथ


राज्यात झालेल्या राजकीय उलथा-पालथला कारणीभूत ठरलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिंदे गटातील मंत्री आणि आमदारही असणार आहेत. महाराष्‍ट्राच्या राजकारणात जून महिन्यात राजकीय भूकंप झाला होता. यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडी सरकार कोसळलं होतं. इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार देखील व्हावं लागलं होतं. त्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) मदतीने सत्ता स्थापनेचा दावा केला होता. नंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्‍यमंत्रिपदाची तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. 


महत्त्वाच्या बातम्या:


Jalgaon: जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत रणकंदन; एकनाथ खडसे एकटे पडले, तरीही विजयाचा विश्वास- कसं आहे राजकारण?