मुंबई: राष्ट्रवादी काँगेसचे दिवंगत नेते आर आर पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबतची घोषणा केली.


तसंच नगरपालिका निवडणुकीत बहुतेक ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर लढणार आहे. मात्र विधानपरिषद आणि स्थानिक संस्था निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करणार असल्याचंही तटकरेंनी यावेळी सांगितलं.

विधानपरिषद निवडणुकीत आमच्या जागा आम्हाला मिळाव्यात. आता आम्ही काँग्रेसच्या निर्णयाची वाट पाहतोय, ४-१ चा फार्म्युला काँग्रेससमोर ठेवला आहे, असं तटकरे म्हणाले.

यवतमाळ, सांगली-सातारा या जागा आमच्या आहेत, त्या जागा आम्ही लढवणार आहे, असं तटकरेंनी नमूद केलं.

नगरपालिका, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीतही इनकमिंग होत आहे. विविध पक्षाच्या छोट्या-मोठ्या स्थानिक नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.