नवी मुंबई : नवी मुंबई पालिका आयुक्त म्हणून पदावर आजही कायम आहे. जोपर्यंत सरकार हटवत नाही, तोपर्यंत काम करत राहणार. कायद्यानुसार काम करणं, लोकांच्या समस्यांवर काम करणं, ही माझी जबाबदारी आहे, रिझल्ट देणं माझं काम आहे, असा निर्धार तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केला.  वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांननी एबीपी माझाला खास मुलाखत दिली.


मी माणूस आहे, सर्वज्ञानी नाही.  जलद निर्णयांमुळेच कदाचित माझ्याबाबतीत जास्त वाद होत असतील, असं आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले.

वेळ देत नसल्याचा आरोप चुकीचा

मी वेळ देत नाही हा नगरसेवकांचा आरोप चुकीचा आहे. दर बुधवारी एक तास नगरसेवकांसाठी असतो. मी कोणालाही बसवून ठेवत नाही, असं तुकाराम मुंढे म्हणाले. माझ्याविषयी अनेक गैरसमज पसरवले जात आहेत, असंही मुंढे म्हणाले.

नियमाला धरुनच निर्णय

नवी मुंबईच्या नागरिकांसाठी आवश्यक ते सर्व निर्णय तातडीने घेतले. हे सर्व निर्णय नियमाला धरुनच घेतले. रस्त्यावरील फेरीवाल्यांवर आणि मनपाच्या जागेवर बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई केली, प्रकल्पग्रस्तांवर कुठलीही कारवाई केली  नाही, असंही तुकाराम मुंढेंनी सांगितलं.

रिझल्ट देणं माझं काम

कायद्यानुसार काम करणं, लोकांच्या समस्यांवर काम करणं, ही माझी जबाबदारी आहे, रिझल्ट देणं माझं काम आहे, असं मुंढे म्हणाले.

चूक असेल तर दाखवा

माझी चूक असेल तर दाखवा, चुका दुरुस्त करायलाच हव्या, चुका झाकून काम करणार नाही. मात्र मी काही चुकीचं केलं नाही, असा विश्वास तुकारा मुंढेंनी व्यक्त केला.

आकसबुद्धीने वागलो नाही

शहर-नागरिकांना सुविधा पुरवणं हे माझं काम आहे. मी कोणाविरोधातही आकसबुद्धीने वागलो नाही. माझ्याविरोधात कोण आकसबुद्धीने वागत असेल, तर त्याबाबतची मला कल्पना नाही, असं तुकाराम मुंढे यांनी नमूद केलं.

बदल्यांचा विचार करत नाही

प्रशासकीय सेवेत रुजु होताना बदल्यांचा विचार नसतो. बदल्या किती होतात याचा विचार करत नाही, पण का होतात याचा विचार करेन. काही त्रुटी असतील तर त्या दूर करेन, असंही स्पष्टीकरण मुंढेंनी दिलं.

जनतेसाठी एक पाऊल मागे घेण्यास तयार

जनतेसाठी एक पाऊल मागे घेण्यासाठी काहीच अडचण नाही. मी कधीही आडकाठी घातली नाही. संवाद साधण्यासाठी मी कमीपणा घेत नाही. महापौरांना मी स्वत: फोन करुन त्यांनी एका शाळेत चर्चेसाठी बोलावलं, त्या ठिकाणी जाऊन चर्चा केली.

मी माणूस, सर्वज्ञानी नाही

मी माणूस आहे, सर्वज्ञानी नाही. माझ्याबद्दलचे वाद कदाचित मी घेत असलेल्या जलद निर्णयांमुळे असतील, असं तुकाराम मुंढे म्हणाले.

जिथे बदली होईल, तिथे जोमाने काम करेन


अविश्वास ठराव मंजूर झाला असला, तरी सरकार जोपर्यंत हटवत नाही, तोपर्यंत इथे काम करत राहणार. जर बदली झालीच, तर जिथे बदली होईल, तिथेही जोमाने, यापेक्षा जास्त उत्साहाने काम करेन, असं मुंढे म्हणाले.



तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबईत केलेली कामं

*स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची सर्वात प्रभावी अंमलबजावणी

*111 पैकी 85 प्रभाग हागणदारीमुक्त

*एमआयडीसीकडे शौचालय उभारणीसाठी 79 भूखंडांची मागणी

*जुन्या 439 पैकी 207 शौचलयांची नव्याने दुरुस्ती

* सहा महिन्यात 260 कोटींचा मालमत्ता कर वसूल

* एलबीटी विभागाकडून 467 कोटींची वसूली

* मालमत्तांचा योग्य वापर करण्यासाठी उपाययोजना

* नेरुळ ऐरोलीत रुग्णांना परवडणाऱ्या रुग्णालयांचं काम सुरु

*नवीन 30 डॉक्टरांची नियुक्ती

*गतवर्षीच्या तुलनेत डेंग्यू, मलेरिया रोखण्यात यश

*ओला आणि सुक्या कचऱ्याचं वर्गीकरण करणारी राज्यातील एकमेव महापालिका

*100 मेट्रिक टन सुक्या आणि 50 मेट्रिक टन सुक्या कचऱ्याचं नियमित वर्गीकरण

*शहरातील 700 पैकी 200 कचराकुंड्या काढण्यात यश

*स्वच्छता सैनिक ही यशस्वी आणि अभिनव संकल्पना राबवणारी पहिली महापालिका

*या मोहिमेंतर्गत 460 शाळांतील 2 लाख विद्यार्थी स्वच्छतादूत बनले

*65 टन निर्माल्य संकलित करण्यात यश

*महापालिकेचं संकेतस्थळ अद्ययावत करत ई-गव्हर्नन्सला प्राधान्य

*जन्म दाखल्यापासून 23 सेवा ऑनलाईन

*कर भरणा करण्यासाठी पेमेंट गेट वे सुविधा सुरु

*तक्रारीची दखल घेऊन आठ दिवसात उत्तर देण्याची सुविधा, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई

*सर्व प्रकारचे परवाने ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यास सुरुवात

*एवढ्या सेवा ऑनलाईन करणारी राज्यातील पहिलीच महापालिका

*दहा वर्षांपासून बंद पडलेले रस्ते पुन्हा सुरु केले