बीड : भीक नको पण कुत्रे आवर असं म्हणण्याची वेळ बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर आली आहे. कापूस विकत घेण्यासाठी शासनाने शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरु केलं आहे. मात्र खरेदी केंद्र आठवड्यातून एक किंवा दोनच दिवस चालू असतात आणि म्हणून आपला कापूस खरेदी केंद्रावर घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना तीन दिवस खरेदी केंद्रावर ताटकळत बसावं लागत आहे. बीड जिल्ह्यातील तेलगावमध्ये सुरु असलेल्या शासकीय खरेदी केंद्रावर ती शनिवारपासून शेतकऱ्यांच्या वाहनांच्या रांगा रस्त्याच्या तीन किमीपर्यंत लागल्या आहेत. आता आठवड्यातून केवळ दोनच दिवस याठिकाणी खरेदी केंद्र उघडे राहणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी दोन दिवस आधीपासूनच वाहने रांगेत उभी केली होती.


पणन महासंघाच्या खरेदी केंद्रावर खरेदी करण्याची जबाबदारी कर्मचारी म्हणजे ग्रेडरवर असते. गंमत म्हणजे 5 खरेदी केंद्रासाठी एकच ग्रेडरची नियुक्ती पणन महासंघाकडून करण्यात आली आहे. म्हणजे ज्यावेळी एका खरेदी केंद्रावर ग्रेडर कापसाची खरेदी करुन घेत असेल त्यावेळी इतर चार खरेदी केंद्रांवर संपूर्ण यंत्रणा बंद ठेवली जाते. शासकीय हमीभाव केंद्रावर प्रति एका क्‍विंटल कापसाला 5500 रुपये पर्यंतचा भाव मिळत आहे. मात्र हे पैसे मिळायला ही शेतकऱ्यांना महिना-दीड महिना वाट पाहावी लागते. शासनाकडून पणन महासंघ आणि सीसीआय या दोन संस्थांमार्फत सध्या शासकीय हमीभाव केंद्र सुरु करण्यात आले आहेत. मात्र हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांना ताटकळत बसण्याची वेळ आली आहे..


आता आणखी शेतकरी कापूस विकण्याची वाट बघत आहेत, त्यांच्यासाठी पणन खात्यानं आणखी एक निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांना आपला कापूस शासकीय खरेदी केंद्रावर घालायचा आहे, त्या शेतकऱ्यांनी आधी बाजार समितीकडून आपल्या कापसाची नोंद करुनच पुन्हा खरेदी केंद्राकडे कापूस द्यावा, असा आदेश काढला आहे. पणन महासंघाने राज्यात सर्वात जास्त म्हणजे 13 लाख क्विंटल कापसाची खरेदी बीड जिल्ह्यात केली आहे. आणखीही अनेक शेतकरी आपल्या कापसाची विक्री करण्यासाठी वाट बघत असतानाच आधीच रांगेत असलेल्या शेतकऱ्यांना ताटकळत बसण्याची वेळ आल्याने भीक नको पण कुत्रा आवर, असं म्हणायची वेळ आज शेतकऱ्यांवर आली आहे.