सोलापूर : सोलापूर शहरात 31 मार्चपर्यंत शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी जारी केले आहेत. त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईन होण्याची शक्यता धूसर झाली आहे. विद्यापीठाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन या संदर्भात मागील काही दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. मात्र पालिका आयुक्तांनी काढलेल्या या आदेशामुळे परीक्षा ऑनलाईन होण्याची शक्यता जास्त आहे.
अद्याप कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही
मात्र या संदर्भात मंगळवारपर्यंत अधिकृत निर्णय जाहीर करण्यात येईल अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी परीक्षा संचालक श्रणिक शाह यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. सोलापूर शहरातील महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे परीक्षा ऑनलाईन घ्यावे लागण्याची शक्यता आहे. मात्र यासंदर्भात अद्याप कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही. सोमवारी विद्यापीठात सिनेटची बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे सोमवारी देखील प्रशासकीय बैठक होण्याची शक्यता कमी आहे. जर सोमवारी प्रशासकीय बैठक झाली तर सोमवारी अन्यथा मंगळवारी परीक्षांसंदर्भात अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल. अशी प्रतिक्रिया विद्यापीठाचे प्रभारी परीक्षा संचालक श्रणिक शाह यांनी एबीपी माझाशी फोनवरुन बोलताना दिली.
विद्यापीठाकडून ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने परीक्षा घेण्याची तयारी
जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात द्वितीय आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा विद्यापीठाने ऑनलाईन घेतल्या होत्या. मार्च अखेरीस आणि एप्रिल महिन्यात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत. जवळपास 35 हजार विद्यार्थी या परीक्षांना बसणार आहेत. राज्यभरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने राज्य सरकारने स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे आदेश विद्यापीठांना दिले होते. त्यानुसार सोलापूरची परिस्थिती पाहता विद्यापीठाने ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने परीक्षा घेण्याची तयारी केलेली आहे. मात्र सोलापुरात देखील कोरोनाचा प्रादूर्भाव वाढतोय. त्यात शहरातील महाविद्यालये 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आल्याने विद्यापीठ ऑनलाईन परीक्षा घेण्याची शक्यता जास्त आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI