यवतमाळ : राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनामामुळे रिक्त झालेल्या पदावर कुणाची वर्णी लागणार? असा सवाल आता उपस्थित होत आहे. या पदावर आता काही जणांनी दावा देखील केला आहे. यात संजय राठोड यांच्याच मतदारसंघातील दारव्हा नगरपरिषदेमधील शिवसेना नगरसेवकाने मंत्रीपदावर दावा केला आहे. या नगरसेवकाने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. त्यात 'माझा अभ्यास दांडगा, मला वनमंत्री करा' अशी मागणी केली आहे.  रवी तरटे असे नगरसेवकाचे नाव आहे. तरटे हे दारव्हा येथील प्रभाग 4 मधून शिवसेनेचे नगरसेवक आहेत. 


तरटे यांच्या या अजब पत्राची  राजकीय वर्तुळात खमंग चर्चा आहे. रवी तरटे यांनी तहसीलदारांमार्फत पत्र मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविले आहे. पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, 5 वर्षांपासून शिवसेना निष्ठावंत म्हणून काम केले आहे. समाजकारणासह राजकारण या विषयावर चांगला दांडगा अभ्यास आहे, असं तरटेंनी पत्रात म्हटले आहे. इतर पक्षातील नेते या पदासाठी चढाओढ करत असून माझी शिवसैनिक म्हणून या पदावर निवड करावी अशी माझी मागणी आहे असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.


तरटे यांनी पत्रात म्हटलं आहे की, माझी मंत्रीमंडळात नियुक्ती केल्यास विदर्भाला मंत्रीमंडळात स्थान मिळेल. राठोड यांच्या राजीनाम्यामुळं रिक्त जागेसाठी पक्षात चढाओढ लागली आहे. विधानसभा मतदारसंघातील असून मला संजय राठोड यांचेही मार्गदर्शन लाभेल. माझ्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन मला विधान परिषदेवर घेऊन वन खात्याचं मंत्रीपद द्यावं, अशी मागणी तरटे यांनी केली आहे. 


"संजय राठोडच्या जागी मला मंत्री करा!" हरिभाऊ राठोड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र


माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचंही मुख्यमंत्र्यांना पत्र, महंतांचा पाठिंबा
संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्या रिक्त जागेसाठी शिवसेनेत जोरदार लॉबिंग सुरु झाले  आहे. विशेष म्हणजे माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या वनमंत्री पदावर नियुक्ती करावी अशी मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री  ठाकरे यांना केली होती. विशेष म्हणजे पोहरादेवीचे महंत सुनील महाराजांनी देखील हरिभाऊंना पाठिंबा दिला आहे. "हरिभाऊ राठोड यांना मंत्री केल्यास स्वागत करू", असे महंत सुनील महाराजांनी म्हटलं आहे. 


"हरिभाऊ राठोड यांना मंत्री केल्यास स्वागत करू", पोहरादेवीचे महंत सुनील महाराजांची प्रतिक्रिया