Pune water Cut : पुणे शहरावर यावर्षीही पाणी कपातीचं संंकट ओढवण्याची शक्यता आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांमध्ये जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज कालवा समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पुणे शहरातील पाणीकपातीचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे आता पुणेकरांचं लक्ष लागलं आहे. 


पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीतीत ही बैठक होणार आहे. या बैठकीत पुणे शहरातील पाणीकपातीचा निर्णय घेण्यात येण्याची दाट शक्यता आहे. चार धरणं पुणे शहराला आणि ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करतात. खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत याच चार धरणांमधून शहराला पाणी पुरवठा केला जातो. या चारही धरणांना मिळून सध्या साडे अकरा टीएसी एवढाच पाणीसाठी शिल्लक आहे. पुणे शहराला दर महिन्याला सव्वा टीएमसी पाणी लागतं. मात्र यावर्षी एप्रिल महिन्यातच पाणीसाठा कमी झाल्याचं दिसत असल्याने पाणी कपातीचं संकट ओढवण्याची शक्यता आहे.


दरवर्षी 15 जुलैपर्यंत पाण्याचं नियोजन करुन उलब्ध असलेल्या धरणातील पाणी साठ्यातून महापालिका आणि शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो. मात्र यावर्षी अलनिनोच्या प्रभावामुळे पावसाला विलंब होण्याचा आणि पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज वेधशाळेने आणि इतर हवामान अभ्यासकांनी सांगितल्याने प्रशासन सतर्क झाल्याचं बघायला मिळत आहे.  त्यामुळे प्रशासनाने 31 ऑगस्टपर्यंतचं पाणी साठ्याचं नियोजन करण्याची तयारी केली आहे. 


आधी आढावा नंतरच निर्णय...


पुणे शहरात मागील अनेक वर्षांपासून पाणीसाठ्याचं नियोजन करुनच पाणी कपात लागू करण्यात येते. यावेळीदेखील संपूर्ण आढावा घेऊन पुण्यात पाणी कपात लागू करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कालवा समितीची बैठ आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत शहरातील आमदारदेखील हजर राहणार असल्याची माहिती आहे.


आठवड्यातून एक दिवस पाणी बंद?


पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वरसगाव, टेमघर, पानशेत आणि खडकवासला ही चारही धरणं मिळून एकूण 11. 52 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठी 31 ऑगस्टपर्यंत वापरण्याचं नियोजन या बैठकीत होणार आहे. हा पाणीसाठा जर 31 ऑगस्टपर्यंत पुरवण्याचं किंवा वापरण्याचं नियोजन करण्यात आलं तर महापालिकेला आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवावे लागणार आहे.


कोणत्या धरणात किती पाणीसाठा?


खडकवासला - 1.07 टीएमसी
पानशेत - 3.41 टीएमसी
वरसगाव - 6.75 टीएमसी
टेमघर - 0.28 टीएमसी