Nashik Income Tax Raid:  नाशिक शहर (Nashik News) व परिसरातील सात बड्या बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाच्या (Income Tax Raid) पथकाने गेले सहा दिवस छापे टाकले. मंगळवारी ही कारवाई संपली. यात तब्बल 3,333 कोटींचे बेहिशेबी मालमत्तेचे व्यवहार उघडकीस आले.,तर साडेपाच कोटींची रोकड व दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. ‘दिव्य मराठी’ या वृत्तपत्रानं ही बातमी दिली आहे. आयकर विभागाची महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितलं जातंय. 


नाशिकच्या आयकर अन्वेषण विभागासह छत्रपती संभाजीनगर, ठाणे, पुणे, मुंबई, नागपूर कार्यालयातील 225 अधिकारी-कर्मचाऱ्यांचं पथक दिवस- रात्र ही कारवाई करत होतं. 90 हून अधिक वाहनांच्या ताफ्यातून आलेल्या या पथकांनी बिल्डरांची 40 ते 45 कार्यालये, बंगले, फार्म हाऊसवर छापे टाकले. नाशिक शहरात ठिकठिकाणी छापासत्र सुरू असतानाच त्याच पथकातील काही पथकांनी इगतपुरी शहरात छापा टाकला. तेथील एका बड्या लॉटरी व्यावसायिकाकडे जवळपास 10 ते 15 अधिकाऱ्यांनी तळ ठोकून दिवसभर चौकशी केली. याच्या छाप्यात सुमारे 70 ते 80 कोटींची बेहिशेबी मालमत्ता आढळून आल्याची चर्चा आहे.


नाशिकसह मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगरच्या पथकांनी एकत्रितपणे बुधवारी (19 एप्रिल) रात्रीच शिर्डी येथे अधिकाऱ्यांनी एकत्रित बैठक घेऊन गुरुवारी (20 एप्रिल) पहाटेच नियोजनानुसार मोहीम फत्ते करण्याचे निश्चित केले. कुणालाही संशय येऊ नये, यासाठी अधिकारी वेगवगेळ्या ठिकाणाहून कारमधून दाखल झाले. पहाटे सहा वाजेपासून बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयाबाहेर वाहने उभी राहिली. दीडशेहून अधिक पोलिस कर्मचारी बंदोबस्तावर होते. या कारवाईत आयकर विभागाच्या हाती मोठे घबाड लागण्याची शक्यताही वर्तवली जात होती. शहरात अनेक व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात प्रकल्प सुरू आहेत. त्यात कागदावर अतिशय कमी उलाढाल दाखवून करचुकवेगिरी केल्याच संशय आयकर विभागाकडून व्यक्त केला जात आहे. 


बांधकाम क्षेत्रामध्ये मोठी खळबळ


आयकर विभागाच्या छाप्यांनी नाशिकच्या बांधकाम क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अचानक हे छापे पडले. हे सर्व अधिकारी नाशिक, औरंगाबाद, पुणे, मुंबई येथील असल्याचे सांगितले जाते. त्यातच शहरातील अत्यंत नामांकित बांधकाम व्यावसायिक या छाप्यांमध्ये लक्ष करण्यात आले आहेत. हे छापे नक्की कशासाठी टाकण्यात आले, आयकर चोरी की अघोषित संपत्ती की अन्य काही हे अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान एप्रिल महिन्यात हे छापे पडल्याने आयकर चोरीचा संशय? अघोषित संपत्ती? की इतर काही कारणे आहेत. याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागल असून या छापेमारीत आता काय समोर येतय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.