Pune Rickshaw Strike : पुण्यात (pune) बेकायदा बाईक टॅक्सी (Bike taxi) विरोधात रिक्षा (Rickshaw ) चालक आक्रमक झाले आहेत. पुण्यात आजपासून ऑटो रिक्षाचालकांनी बेमुदत संप पुकारला आहे. बेकायदा बाईक टॅक्सी बंद व्हावी म्हणून पुण्यात रिक्षाचालक बेमुदत संप आहे. पुण्यात एकूण 12 रिक्षाचालक संघटना आहेत. या रिक्षा चालकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या सगळ्या संघटना बाईक टॅक्सी बंद (Bike taxi) विरोधात एकत्र आल्या आहेत. त्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. मात्र याचा फारसा परिणाम रिक्षा वाहतुकीवर होताना दिसत नाही आहे. पुण्यातील रस्त्यांवर रिक्षा वाहतूक बर्यापैकी सुरु असलेली दिसत आहेत.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये बाईक टॅक्सी मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. याचा फटका इतर रिक्षाचालकांना बसतो. त्यांना भाडं मिळणं कठीण होतं. याचा परिणाम त्यांच्या कमाईवर होतो. बाईक टॅक्सी बंद करण्याची मागणी त्यांनी यापूर्वी देखील केली होती. काही प्रमाणात आंदोलनंही झाली होती. मात्र त्यांची मागणी मान्य न झाल्याने त्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. संपात एकूण 12 रिक्षाचालक संघटना सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे अनेक रिक्षाचालक सहभागी होणार आहे. त्याचा फटका विद्यार्थांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकांनी शाळेसाठी नेहमीपेक्षा लवकर निघावं लागणार आहे आणि बाहेर पडताना पुणेकरांना प्रवासाची सोय स्वत: करावी लागणार आहे.
पोलिसांकडून संघटनांना नोटीस
बेमुदत आंदोलनामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी, रुग्ण आणि सर्वसामान्यांना त्रास होऊ नये, यासाठी कायदेशीर मार्गाचा वापर करावा. त्याचप्रमाणे आरटीओ कार्यालयाबाहेर फार गर्दी करु नये. सरकारने दिलेल्या आदेशाचं पालक करावे. नाहीतर रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी नोटीस बंडगार्डन पोलिसांकडून देण्यात आली आहे.
कोरोनानंतर रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ
कोविडनंतर अनेक रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनानंतर त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला. त्यानंतर अनेक पुणेकरांनी बाईक टॅक्सी किंवा कॅबला प्राधान्य दिलं. त्यामुळे रिक्षाचालक संतापले आहेत. एका भाकरीमध्ये शंभर तुकडे सरकार करत असल्याचा आरोप रिक्षाचालकांनी केला आहे.
पीएमपीकडून अतिरिक्त बस
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील रिक्षा संघटनांनी या संपाला पाठिंबा दिला आहे. या संपात 50 ते 60 हजार रिक्षाचालक सहभागी होणार आहेत. या संपामध्ये जास्तीत जास्त रिक्षाचालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन 'बघतोय रिक्षावाला' संघटनेने इतर रिक्षाचालकांना केलं आहे. पीएमपीएमएलकडून देखील नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून अतिरिक्त बस सोडण्यात येणार आहे. लांब पल्ल्याच्या बस कमी करुन प्रवाशांची गर्दी पाहून बस संचलन करण्यात येणार असल्याचं पीएमपी प्रशासनाने सांगितलं आहे.