Aurangabad Measles Disease Update: औरंगाबाद जिल्ह्यात गोवरचा प्रादुर्भाव आता अधिकच वाढतांना पाहायला मिळत असल्याचे चित्र असून, आता यात आणखी दोन रुग्णांची भर पडली आहे. विशेष म्हणजे यात सर्वाधिक रुग्ण शहरातील असल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत गोवरचे एकूण पाच रुग्ण आढळून आली आहेत. तर संशयितांची संख्या 41 वर पोहचली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग खडबडून जागे झाले असल्याची चित्र आहे.


औरंगाबाद शहरात गोवरचा फैलाव वेगाने होत आहे. दरम्यान रविवारी आणखी दोन संशयित रुग्णांचे अहवाल गोवर पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. ज्यात एक बालक सात वर्ष आणि दुसरा तीन वर्ष वयाचा आहे. हे दोन्ही बालक नाहीद कॉलनीतील आहेत. ते उपचार घेऊन घरी परतलेले असून सध्या त्यांची प्रकृती चांगली असल्याचे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले आहे. 


संशयित रुग्णांची संख्या वाढतेय...


औरंगाबाद जिल्ह्यातील नोव्हेंबर महिन्यातील गोवर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता पाच झाली आहे. ज्यात चार रुग्ण शहरातील आणि एक रुग्ण ग्रामीण भागातील आहे. तर एकूण संशयित रुग्णांची संख्या ही 41 झाली आहे. या सर्वांचे रक्त नमुने मुंबई येथील हाफकिन प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहे. रविवारी ज्या दोन बालकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले ते शहरातील नेहरूनगर आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या नाहिद कॉलनीतील असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. 


दोन संशयितांची भर


ज्याप्रमाणे शहरात गोवर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याचप्रमाणे संशयित रुग्ण देखील वाढत आहे. रविवारी शहरात आणखी दोन संशयित रुग्णही आढळून आले. यातील एक हडको एन-11 येथील आहे. तर दुसरा जटवाडा रोड भागातील आहेत. या दोन्ही बालकांचे रक्त नमुने तपासणीसाठी मुंबईला पाठविण्यात आले असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने कळविले आहे. त्यामुळे आता त्यांच्या अहवालाकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागून आहे. 


वेगवेगळ्या भागात सर्वेक्षण 


औरंगाबादमध्ये गोवरचे संशयित रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत असल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे महापालिकेसह जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक अलर्ट झाली आहे. तसेच आरोग्य विभागाकडून वेगवेगळ्या भागात सर्वेक्षण करण्यात येत आहे. विशेष म्हणजे संशयित रुग्ण आढळून आलेल्या भागात विशेष लक्ष दिले जात आहे. त्याबरोबरच लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. त्यामुळे सद्यस्थिती परिस्थिती संपूर्णपणे आटोक्यात असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. 


Measles Disease: चिंताजनक! औरंगाबाद शहरात पुन्हा गोवरचे आठ संशयीत रुग्ण आढळले