Lumpy Skin Disease: राज्यात अजूनही जनावरांमधील लम्पीचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease) काही थांबताना दिसत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या अहमदनगरनंतर आता कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्याच मतदारसंघात लम्पीने अक्षरशः थैमान घातला असल्याची पाहायला मिळत आहे. 'लोकमत'ने दिलेल्या वृत्तानुसार सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातील उपळी येथील 3 शेतकऱ्यांच्या जनावरांचा लम्पी आजाराने मृत्यू झाला. तर गावात सध्या 35 ते 40 जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 


ग्रामीण भागात सद्या लम्पीचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. तर सरकारकडून लम्पी आजार नियंत्रणात असल्याचा दावा सतत केला जात आहे. मात्र स्थनिक पातळीवर परिस्थिती वेगळीच पाहायला मिळत आहे. त्याचंच उदाहरण म्हणजे अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड तालुक्यातील उपळी म्हणून असलेलं गावातील परिस्थिती. कारण लम्पी आजाराने उपळीत थैमान घातले असून शेतकरी प्रकाश छगन मंडोरे यांचा बैल आठ दिवसांपूर्वी लम्पीने मरण पावला. तसेच रवींद्र सांडू जाधव यांची 50  हजार रुपयांची गाय 19  नोव्हेंबर रोजी तर हरी देवीदास शेजूळ यांचे 25  नोव्हेंबर रोजी वासरू व 26  नोव्हेंबर रोजी एक गाय यांचा मृत्यू झाला. त्यामुळे लम्पीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होण्यापेक्षा अधिक वाढत असल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


एकट्या गावात चाळीस जनावरं बाधित


सिल्लोडमधील उपळी गावातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कारण गावात लम्पी बाधित जनावरांची संख्या चाळीस पर्यंत पोहोचली असून, पशुवैद्यकीय विभागाकडून याची दखल घेतली गेली नाही. प्रशासनाकडून लसीकरणाचा दावा केला जात असला तरीही, या गावात लसीकरणासाठीही कोणतेही शिबिर आयोजित करण्यात आला नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. तर पशुपालकांनी इतरत्र जाऊन आपल्या जनावरांना लसीकरण केले आहे. 


लसीकरण करूनही जनावरे बाधित...


जनावरांना लम्पीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र लसीकरण करूनही जनावरे बाधित होत असल्याचे समोर आल्याने शेतकरी हतबल झाले आहे.त्यात गावातील अनेक जनावरे बाधित झाल्याने आपापल्या जनावरांना सुरक्षित ठेवण्यासाठी पशुपालकांची धरपड सुरु आहे. त्यातच रब्बीचा हंगाम सुरु असून अशात जनावरांना लम्पीची लागण होत असल्याने बळीराजा मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकरी करत आहे. 


Lumpy Skin Disease : लम्पीमुळे संपूर्ण राज्यात जनावरे दगावण्याचं प्रमाण बुलढाण्यात सर्वाधिक, आतापर्यंत 3993 गुरे दगावली