पुणे : पुणे जिल्ह्याला प्रगत आणि विकसित मानलं (Pune News) जातं. मात्र याच पुण्यातील एका गावातील भीषण वास्तव समोर आलं, जीवंत असताना प्रत्येकाला संघर्ष करावाच लागतो, मात्र मरणानंतरही मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. गावामध्ये समशानभूमीच नसल्याने रस्त्यावरच मृतदेह पेटवण्याची वेळ पुणे जिल्ह्यातील आतकरवाडी गावातील पन्हाळकर कुटुंबियांवर आली. एकीकडे स्मार्ट सीटी म्हणून पुण्याची ओळख होत असताना दुसरीकडे गावात स्मशानभूमी नसल्याचं समोर आलं आहे. 


घेरा-सिंहगड ग्रामपंचायत हद्दीत हे आतकरवाडी गाव आहे. या गावामध्ये स्मशानभूमी नसल्याने गावकऱ्यांवर मृताचे अंत्यसंस्कार रस्त्यावर करण्याची वेळ ओढवली होती. गावामध्ये समशानभूमी नाही. त्यातच पाऊस सुरू असल्याने ओढ्याला पाणी आले होते. त्यामुळे चितेवर आसरा म्हणून लाकडी खांब उभे करून त्यावर पत्रे टाकून गावकऱ्यांनी रस्त्यावरच अंत्यविधी करण्यात आला. ज्योती लहु पन्हाळकर या 41 वर्षीय महिलेवर अशा भीषण पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पर्यटकांची वाहणे रस्त्यावर अडकून पडली होती. वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती.


गावातील कार्यकर्त्यांशी चर्चा झाली आहे आणि स्मशानभूमीची उपलब्धता लवकर करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आगामी पावसाळ्यापूर्वी आतकरवाडी स्मशानभूमी चांगली तयार केली जाईल, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. त्यातच पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आमच्या गावाची ही दुसरी बाजू आहे. ऋतू कोणताही असो, उन्हाळा किंवा पावसाळा-अंत्यविधीसाठी हीच परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना गावाची दुसरीबाजूही दिसते. यावर तोडगा काढला पाहिजे, असं गावकऱ्यांनी म्हटलं आहे. 


ग्रामपंचायतीने स्मशानभूमीसाठी वनविभागाकडे प्रस्ताव सादर करून या प्रकरणाचा तत्परतेने पाठपुरावा केला आहे. मात्र मंजुरी अद्याप प्रलंबित आहे. वनविभागाकडून तातडीने कार्यवाही होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जागेबाबतही चर्चा करण्यात येणार असल्याचं आतरवाडी गावातील सरपंचांनी सांगितलं आहे. 


पुणे जिल्ह्यातील गावांची परिस्थिती अशी तर राज्याचं काय?


पुणे जिल्हा किंवा पश्चिम महाराष्ट्र हा भाग राज्यातील सधन आणि तुलनेत काही प्रमाणात विकसित मानला जातो. या भागांत अनेक ठिकाणी आदिवासी पाडे आहेत. मात्र गावागावात प्रत्येक ठिकाणी उत्तम सोयी सुविधा दिल्या गेल्या असल्याचा दावा कायम करण्यात येतो. मात्र अशी एखादी घटना घडली की, सोयी सुविधा नसल्याचं उघड होते. याच सधन आणि प्रगत असलेल्या जिल्ह्यात अशी परिस्थिती आहे तर राज्यात खरंच गावात सोयी सुविधा मिळत असतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Ajit Pawar In Baramati : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार 'होम ग्राऊंड'वर जाणार, कसा असेल बारामती दौरा?