Pune News : राज्यासह पुण्यात अवकाळी पावसानं (Pune  News) थौमान घातलं आहे. याच अवकाळी पावसात तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शेतात पाणी द्यायला गेला असता वीज पडून या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दीपक काळभोर असं य़ा तरुणाचं नाव आहे. या तरुणाचं दीड महिन्यापूर्वीच त्याचे लग्न झाले होतं. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली आहे. पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरात ही घटना घडली आहे. 


दीड महिन्यापूर्वीच त्याचे लग्न झाले. सुखी संसाराचं स्वप्न रंगवत होता. मात्र काळानं घाला घातला आणि सुखी संसाराला नजर लागल्यासारखी घटना घडली.  29 वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेला असताना अंगावर वीज कोसळल्याने दीपक काळभोर या तरुण शेतकऱ्याचे दुर्दैवी निधन झाले. लोणी काळभोरमध्ये दीपक आपल्या कुटुंबियांसोबत राहत होता. दीड महिन्यापूर्वीच त्याचं लग्न झालं होतं. मात्र त्याच्या निधनाने सुखी संसाराचं स्वप्न अपुरंच राहिलं. 


वीज अंगावर पडली अन्...


काल पुणे शहरात आणि पुणे ग्रामीण परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली होती. वीजांच्या गडगडाटासह सुसाट्याचा वारा आणि वीजांचा कडकडाट झाला. याच दरम्यान दीपक लोणी काळभोर येथील त्यांच्या शेताला पाणी देण्यासाठी दीपक गेला होता. त्यावेळी तो रोजप्रमाणे शेतात पाणी देत होता. अचानक जोरात वीज कडाडली आणि पडली. यातच दीपकचा जागेवर जीव गेला. 


घरी न आल्याने कुटुंबियांनी घेतली शेतात धाव


पाऊस सुरु होता. वादळी वातावरण होतं. मात्र यातच दीपक बराचवेळ घरी न परतल्याने त्याचं कुटुंब चिंतेत पडलं. त्यानंतर कुटुंबियांनी अनेक ठिकाणी विचारपूस केली. मात्र दीपक सापडला नाही. कुटुंबियांनी थेट शेतात धाव घेतली. त्यावेळी शेतात दीपक जमिनीवर पडल्याचे दिसून आलं. कुटुंबियांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरने सांगितले. 


गावात शोककळा...


दीपक याचं नवीन लग्न झालं होतं. त्यामुळे त्याच्या अचानक जाण्याने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शिवाय गावकऱ्यांनीही त्यांच्या निधनामुळे शोक व्यक्त केला आहे. संपूर्ण गावातच दीपकच्या मृत्यूमुळे शोककळा पसरल्याचं दिसत आहे. अनेक लोक कुटुंबियांचं आणि त्यांच्या पत्नीचं सांत्वन करत आहे.