पुणे : पुण्यातील पाषाणकर उद्योग समुहाचे प्रमुख गौतम पाषाणकर हे बुधवारी संध्याकाळपासून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे दिली आहे. त्याबरोबरच गौतम पाषाणकर यांनी सुसाईड नोट लिहिल्याचंही स्पष्ट झालं आहे.  व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे आत्महत्या करत असल्याचं पाषाणकर यांनी या सुसाईड नोटमधे नमुद केलं आहे.

पाषाणकर यांची गाड्यांची डीलरशीप, गॅस एजन्सी आणि इतरही अनेक व्यवसाय आहेत.  बुधवारी लोणी काळभोर इथल्या गॅस एजन्सीमधे जाऊन गौतम पाषाणकर हे शिवाजी नगर मधील त्यांच्या कार्यालयात परत आले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरकडे एक लिफाफा दिला आणि ड्रायव्हरला तो घरी द्यायला सांगितला. त्यानंतर गौतम पाषाणकर हे चालत पुणे विद्यापीठाच्या दिशेनं गेल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं आहे. तेव्हापासून पाषाणकर बेपत्ता आहेत. पाषाणकर यांचं नक्की काय झालं याचा पोलिस तपास करत आहेत.


पाषाणकर यांच्या ड्रायव्हरने सांगितलं की, त्यानं  पाषाणकर यांना फोन केला असता त्यांनी उत्तर दिलं नाही. त्यामुळे ड्रायव्हरने याची माहिती त्यांचा मुलगा कपिल पाषाणकर यांना दिली. यानंतर कुटुंबाने शोध सुरू केला मात्र त्यांचा कुठेही पत्ता न लागल्याने अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रकाश मुलाळे करीत आहेत. गौतम पाषाणकर हे कोणाला आढळल्यास त्यांनी कपिल पाषाणकर (  9822474747) किंवा शिवाजीनगर पोलिस ठाणे (020-25536263) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.