Pune Airline: पुण्यातून (Pune) आता थेट जर्मनी (Germany), इंग्लंड (England) आणि अमेरिकेसाठी (America) विमानसेवा सुरु होणार आहे. नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शनिवारी ही घोषणा केली आहे. पुणे-बँकॉक विमानसेवेचे शनिवारी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी या तीन देशात विमानसेवा सुरु करणार अशी घोषणा केली आहे. या विमानसेवेचा अनेक पुणेकरांना फायदा होणार आहे.
केंद्रीय मंत्री शिंदे यांनी यावेळी ऑनलाइन भाषण केलं. त्यावेळी पुण्याला जर्मनी, इंग्लंड आणि अमेरिकेसाठी कॉल ऑफ कॉल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात पुण्यातील सध्याच्या धावपट्टीचा विस्तार केल्यास अमेरिका, इंग्लंड आणि जर्मनीशी थेट कनेक्टिव्हिटी मिळू शकेल, असं ते म्हणाले. पुणे माझे शहर आहे. हे देशाचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र देखील आहे. या शहराच्या कानाकोपऱ्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे स्पर्श आहे. याशिवाय, हे राष्ट्रवाद आणि साम्यवादाचे केंद्र आहे. मला अभिमान आहे की मला या शहराची आणि पुण्याच्या लोकांची सेवा करण्याची संधी मिळत आहे, असंही ते म्हणाले.
पुणे विमानतळावरील प्रवाशांची रोजची गर्दी लक्षात घेऊन आम्ही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना पुण्यातील आठ स्लॉट वाढवण्याची विनंती केली. पण त्याने आम्हाला तब्बल 14 स्लॉट वाढवले. त्यामुळे आता विमानतळावरील गर्दी कमी होण्यास मोठी मदत होणार असल्याचे शिंदे म्हणाले.
व्हॅट कमी केल्यास उड्डाणं वाढतील
महाराष्ट्रातील विमान कंपन्यांना सेवा सुरू करण्यासाठी 26 टक्के व्हॅट भरावा लागतो. इतर राज्यांमध्ये व्हॅट 3 ते 4 टक्क्यांनी कमी आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने व्हॅट कमी केल्यास भविष्यात पुणे विमानतळावरून आणखी उड्डाणे वाढतील. आम्ही व्हॅट कपातीचा प्रस्ताव महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. या संदर्भातील चर्चा सकारात्मक झाली आहे लवकरच निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
पुणे-बँकॉक सेवा सुरु
पुणे विमानतळावरून सुरू झालेली पुणे-बँकॉक सेवा सध्या आठवड्यातून फक्त चार दिवस आहे. मात्र, आठवडाभर ही सेवा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहील. त्यामुळे लवकरच ही विमानसेवा पुणेकरांसाठी आठवडाभर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्याहून सिंगापूरला विमानसेवा सुरु करण्यात आली. त्या विमानसेवेला चांगला प्रतिसाददेखील मिळत आहे. त्यामुळे बॅंकॉकला थेट विमानसेवा सुरु करण्यात आली. पहिल्याच दिवशी 144 प्रवाशांनी या विमानसेवेचा लाभ घेतला.