हिंगोली: महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेची सुरुवात नांदेड जिल्ह्याच्या देगलूरमधून झाली. यात भारत जोडो यात्रेचा नांदेड जिल्ह्यातील मुक्काम तब्बल चार दिवस आणि 120 किलोमीटरचा होता. मराठवाड्यात काँग्रेसचा गड, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा जिल्हा समजल्या जाणाऱ्या नांदेड जिल्ह्यात भारत जोडो यात्रींचा राहण्याचा, खाण्या-पिण्याचा राजेशाही थाट अशोक चव्हाण यांनी केला होता. यात भारत जोडो यात्रेच्या प्रत्येक 500 मीटर अंतरावर पाणी, फळांची सोय, दुपारच्या आणि संध्याकाळच्या रुचकर जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. नांदेड जिल्ह्यात येथेच्छ पाहुणचार घेतलेल्या भारत जोडो यात्रींची हिंगोली जिल्ह्यात मात्र परवड झाल्याचं चित्र आहे.


हिंगोलीतील या चित्राचं कारण म्हणजे वर्षा गायकवाड आणि काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव या दोन पक्ष नेतृत्वातील फुट. त्यामुळे भारत जोडो यात्रींची चांगलीच आबाळ झालीय. नांदेड जिल्ह्यातल्या चार दिवसांच्या वास्तव्यात स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण भोजन व्यवस्थेमुळे तृप्त झालेल्या भारत यात्रींसह विविध भागांतून आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांची हिंगोली जिल्ह्यात मात्र खाण्या-पिण्याच्या बाबतीत आबाळ झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या जिल्ह्यातील काँग्रेस अंतर्गत बेबनाव खुद्द खासदार राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांच्याही निदर्शनास आला आहे.


या बाबतीत कोणी उघडपणे तक्रार केलेली नाही. पण खा. राहुल गांधी आणि इतर भारतयात्रींच्या 'कॅम्प-ए' मधील भोजन व्यवस्था तसेच इतर सोयींच्या विषयात नांदेड जिल्ह्यामध्ये जी दक्षता घेतली गेली, ती हिंगोली जिल्ह्यात दिसली नाहीय. राजीव सातव यांच्या निधनानंतर या जिल्ह्यात सर्वमान्य स्थानिक नेतृत्व नसल्यामुळे व्यवस्थेत त्रुटी जाणवल्याचे भारतयात्रींचे म्हणणे आहे.


नांदेड जिल्ह्यातून मार्गक्रमण करत भारत जोडो यात्रा सोमवारी हिंगोलीमध्ये दाखल झाली. प्रदेश काँग्रेसने या जिल्ह्यात गर्दी जमविण्याची जबाबदारी अमित देशमुख, विश्वजित कदम, सतेज पाटील आणि प्रा. वर्षा गायकवाड या माजी मंत्र्यांवर टाकली होती. कळमनुरीतील एका ज्येष्ठ कार्यकत्याने दिलेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यातील व्यवस्था आणि नियोजनात खूपच ढिसाळपणा होता. वरील माजी मंत्र्यांनी आपापल्या भांगातील कार्यकर्ते हिंगोली जिल्ह्यात मोठ्या संख्येने आणल्यामुळे प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दिलासा मिळाला. पण राजीव सातव यांच्या पश्चात हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षात आलबेल नसल्याची बाब भारत यात्रीच्या लक्षात आली. राजीव सातव यांच्या पश्चात जिल्ह्यात सर्वमान्य नेता नसल्यामुळे नियोजनावर परिणाम झाल्याचे निरीक्षण महाराष्ट्रातील एका भारतयात्रीने नोंदविले.


भारत जोडो यात्रा मराठवाड्यातून विदर्भाकडे कूच करत असताना काँग्रेस पक्षातील बेबनावाची काही उदाहरणे समोर आली. ही यात्रा नांदेड जिल्ह्यामध्ये असताना, लातूर जिल्ह्यातील विलासराव देशमुख गटाने नांदेडकडे पाठ फिरवली होती. लातूर जिल्ह्याचेच माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर हेही शंकरनगर-नायगाव दरम्यानच्या यात्रा आणि मुक्कामामध्ये येऊन राहुल गांधी यांना भेटून गेले; पण अमित देशमुख आणि त्यांचा गट नांदेड जिल्ह्यात एकदाही फिरकला नाही.


या मागची पार्श्वभूमी अशी, की नांदेड जिल्ह्यातील यात्रेच्या प्रसिद्धीसाठी काँग्रेस पक्षाने ज्या जाहिरात निर्मिती संस्थेमध्ये स्वागत फलक आणि जाहिरातींची रचना तयार करून घेतली होती, त्याच संस्थेकडे आ. अमित देशमुख यांच्या यंत्रणेने हिंगोली जिल्ह्यातील प्रसिद्धीची साधने तयार करून देण्यासंदर्भात संपर्क साधला होता. पण नांदेडमधील काँग्रेसच्या कार्यकत्यांनी या संस्थेला हिंगोलीची कामे करण्यास मनाई केली होती. त्यामुळे भारत जोडो यात्रा नांदेड जिल्ह्याची हद्द ओलांडून हिंगोली जिल्ह्यात गेल्यानंतरच लातूरच्या 'देशमुख कंपनीची तेथे 'एन्ट्री' झाली. ज्यात महामंडळच्या शेकडो एसटी बसमध्ये हजारोंच्या संख्येने लातूरकर भारत जोडो यात्रेत सामील होण्यासाठी दाखल झाले होते.


कळमनुरीमध्येही माजी मंत्री वर्षा गायकवाड आणि आमदार प्रज्ञा सातव यांच्यातील बेबनाव ठळक झाला. तेथे स्थानिक पातळीवर भाऊ गोरेगावकर आणि सातव या दोन गटात आधीपासूनच संघर्ष दिसत होता. त्यात नंतर माजी पालकमंत्री या नात्याने वर्षा गायकवाड यांच्या गटाची भर पडली. खासदार राहुल गांधी एकीकडे 'नफरत छोडो, भारत 'जोडो' असा नारा देत होते. त्याचवेळी हिंगोलीतील कॉंग्रेसमधील नफरतीचे राजकारण प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांसाठी तापदायक बनले हे मात्र नक्की.