Pune News : 'राज्यपालांची टोपी काळी आणि मेंदूही काळा,' असं म्हणत पुण्यातील माजी महापौरांची संघटना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्याविरोधात आक्रमक झाली आहे. त्यांनी पुण्याच्या राजभवनाबाहेर आंदोलन पुकारलं आहे. मागील काही दिवसांपासून राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि स्वराज्य संस्था यांच्यानंतर पुण्याच्या माजी महापौर संघटनेनेही त्यांचा निषेध करत आंदोलन केलं आहे. 


राज्यपालांना पदावरुन हटवण्यात यावं यासाठी माजी महापौर एकत्र आले आहेत. भारतातले लोक देशाचा विचार करण्याच्या विचारातून बाहेर पडले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वक्तव्य करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं तर त्यांना मानाने राजभवनात बसवलं जातं. आपल्या देशाची अजून किती अधोगती बघायची?, असा प्रश्न माजी महापौरांनी उपस्थित केला आहे. राज्यपालांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. दिलगिरी व्यक्त करुन किंवा परत पाठवून महाराजांना अवमान भरुन निघाणार नाही. शिवाजी महाराज नसते तर स्वराज्य स्थापन झालं नसतं आणि पंतप्रधान पांढरी टोपी घालून नमाज पढताना दिसले असते, असं वक्तव्य माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांनी या आंदोलनावेळी केलं आहे. 


राज्यपालांच्या वक्तव्यावरुन सगळा महाराष्ट्र पेटून उठला आहे. त्यामुळे त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी या संघटनेने केली आहे. केंद्र सरकार निगरगट्ट सरकार आहे. जनतेच्या भावना केंद्र सरकार समजून घेत नाहीत. राज्यपालांची नेमणूक झाल्यापासून संघाला आणि भाजपला सोयीस्कर अशी वागणूक ते करताना दिसत आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेकांचा अपमान केला मात्र शिवाजी महाराजांचा अपमान करुन त्यांनी कळस गाठला आहे. शिवरायांचा अपमान महाराष्ट्रातील जनता कधीही सहन करणार नाही. जोपर्यंत राज्यपालांची हकालपट्टी केली जात नाही तोपर्यंत माजी महापौर संघटनेचं आंदोलन सुरु राहिल, असा इशारा माजी महापौर अंकुश काकडे यांनी दिला आहे. राज्यपालांची टोपी काळी आहे आणि त्यांचा मेंदूही काळा आहे, असंही ते म्हणाले.


महाराष्ट्राचा जास्तीत जास्त अपमान राज्यपाल करु शकतात त्यामुळे केंद्राने राज्यपालांना महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून कोश्यारींना ठेवलं आहे. राज्यपाल हे संविधानिक पद आहे. या पदाची गरिमा घालवण्याचं आणि पदाला काळिमा फासण्याचं काम कोश्यारी करत आहेत. आतापर्यंत असे अनेक वक्तव्य करुन त्यांनी राज्यपाल पदाला काळिमा फासला आहे, त्यामुळे त्यांना पदावरुन हटवण्यात यावं, अशी मागणी माजी महापौर संघटनेने केली आहे.