Maharashtra Politics: राज्यात सहा महिन्यांपूर्वी झालेल्या अभूतपूर्व राजकीय घडामोडी घडल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) सरकारला पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाला आर्थिक रसद पुरवण्यात सहभाग असलेल्या एका बिल्डरला सरकारने जबाबदारी दिली असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. राज्य सरकारने नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन केलेल्या 'मित्र'च्या उपाध्यक्षपदी अजय आशर यांनी आर्थिक हातभार लावला. आता शिंदे-फडणवीस सरकारने त्याची परतफेड केली असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. 


शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखात आज पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे खासमखास बिल्डर अजय आशर यांना महाराष्ट्रात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी नियुक्त करून खोके सरकारची दिशा स्पष्ट केली असल्याचे ठाकरे गटाने म्हटले. नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात म्हणे ‘मित्र’ म्हणजे महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. बहुधा अजय आशर यांच्यासाठी 'मित्र'ची स्थापना करण्यात आली असावी असेही त्यांनी म्हटले.  महाराष्ट्रात एकापेक्षा एक वरचढ असे तज्ञ, आर्थिक क्षेत्रातील जाणकार, उद्योग क्षेत्रातील महारथी असताना मुख्यमंत्र्यांनी या पदावर आशर यांची नेमणूक केली असल्याकडे ठाकरे गटाने म्हटले. 


अजय आशर यांच्या गुजरात संबंधानेच महाराष्ट्रातील फुटीर आमदारांना सुरतचा मार्ग दाखवला. सुरतला ‘हिसाब-किताब’ झाल्यावर मग गुवाहाटी. ही सर्व खोके व्यवस्था करणारे हे महाशय महाराष्ट्राच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष होतात. हे जंतर-मंतर फक्त सध्याचे मुख्यमंत्रीच करू शकतात, असा हल्लाबोलही सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. मुळात महाराष्ट्रात ‘खोके क्रांती’ करण्यात या आशर यांचा मोठा आर्थिक हातभारही लागला आहे. त्याच उपकाराच्या ओझ्याखाली दबलेल्या मुख्यमंत्र्यांनी आशर यांची प्रतिष्ठापना केली, पण त्यात महाराष्ट्राचे काय भले होणार? असा सवालही ठाकरे गटाने उपस्थित केला आहे. 


महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजपच्या आशीष शेलार यांनीच श्रीमान आशर यांच्यावर यापूर्वी हल्ला केला होता. आधीच्या सरकारमध्ये विद्यमान मुख्यमंत्री नगरविकास खात्याचे मंत्री होते. त्यावेळी त्यांच्यावर आरोप करताना ‘नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे असले तरी त्या खात्याचे सर्व निर्णय हेच आशर महाशय घेतात, शिंदे यांचे आशर फ्रंटमॅन असल्याचा आरोप त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या भाजपच्या आशिष शेलार यांनी केला होता. आता तर महाराष्ट्राच्या आर्थिक-उद्योग धोरणांबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांनी भाजपास न जुमानता घेतले आणि आशिष शेलार हात चोळत बसले असल्याचा टोलाही ठाकरे गटाने लगावला. 


हे तर भाजपचे ढोंग


सामनाच्या अग्रलेखातून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून भाजपवर टीका करण्यात आली.  ‘कर्नाटकने ‘अरे’ केल्यास ‘कारे’ने उत्तर देऊ.’ असे शेलार यांनी म्हटले होते. मात्र, भाजपचे हे ढोंग असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. कर्नाटकात भाजपचे सरकार आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना तेथील सरकारने बेळगावात येण्यापासून रोखले. महाराष्ट्राच्या शेकडो गावांवर त्यांनी हक्क सांगितला. त्यामुळे प्रकरण ‘अरे’च्या पुढे गेले आहे व ‘कारे’वाले शेपूट घालून बसले आहेत अशी घणाघाती टीका ही शिवसेनेने केली.