Barmati News : बारामती तालुक्यातील कोरडवाहू क्षेत्रात उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता व्हावी या हेतूने तालुका कृषि कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवशक्ती शेतकरी बचत गट, श्रीकृष्ण शेतकरी बचत गट आणि ग्रामस्थ यांच्या लोकसहभागातून वढाणे - काळखैरवाडी येथे 10 वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधाऱ्यामुळे परिसरातील रब्बी पिकांसाठी पाणी उपलब्ध झाले आणि कोरड्या पिकांना ओलावा मिळाला आहे. 


बारामती तालुक्यात निरा डाव्या कालव्यामुळे बहुतांश भागात बारमाही शेती होऊ लागली असली तरी  बराचसा भाग हा कोरडवाहू क्षेत्रात येतो. मौजे वढाणे - काळखैरवाडी  गावशिवाराचा यात समावेश आहे. या भागात सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान पावसाची तीव्रता आणि पाण्याचा प्रवाह कमी होत जातो. अशावेळी पिकांना संरक्षित सिंचन देणे, पशुधनास पिण्याचे पाणी उपलब्ध होण्याकरिता पाणी अडविणे गरजेचे होते.


कृषि विभागाच्यावतीने तालुक्यातील वढाणे - काळखैरवाडी गावातील शेतकऱ्यांना सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत वनराई बंधारे साखळी पद्धतीने बांधण्यासाठी प्रशिक्षण देवून प्रोत्साहित केले. गावात ठिकठिकाणी सभा घेऊन शेतकऱ्यांना वनराई बंधारा बांधण्याचे महत्व पटवून देण्यात आले. प्रथम नाल्याची पाहणी करून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त पाण्याचा साठा निर्माण होईल या हेतूने केवळ सिमेंट खतांची रिकामी गोणी वापरुन माती व वाळू यांच्या मदतीने पाणी वाहणाऱ्या  नाल्याच्या योग्य ठिकाणी प्रवाहाला आडव्या दिशेने बांध घालण्यात आले. 


या वनराई बंधारेमुळे उन्हाळी हंगामाच्या सुरुवातीस रब्बी पिकासाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला. परिणामी भाजीपाला पिकाखालील क्षेत्रात वाढ होऊन  मुख्यत्वे मेथी, कोथिंबीर, कांदा, रब्बी ज्वारी, गहू, हरभरा व भाजीपाल्याचे 48 हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली. पशुधनास मुबलक पाणी मिळू लागले. गावातील भूजल पातळी तसेच  विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. गावामध्ये लोकसहभागातून कार्य करण्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग वाढला.


शालेय विद्यार्थ्यांना पाणी बचतीचे महत्त्व  प्रत्याक्षिकामधून दाखविण्यात आले. गावामध्ये एकजुटीची भावना निर्माण होऊन शेतीच्या शाश्वत विकासासाठी स्थानिक नेतृत्वाची फळी निर्माण झाली. या उपक्रमात गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, मंडल अधिकारी, कृषि अधिकारी, कृषि प्रर्यवेक्षक, कृषि सहायक, बचत गटांचे सदस्य यांनी मोलाचा सहभाग घेतला.  वनराई बंधाऱ्यामुळे झालेला लाभ लक्षात घेता पुढील वर्षीदेखील गावातील सर्व ओढ्यातील पाणी अशाचप्रकारे अडविण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.


सुप्रिया बांदल, तालुका कृषि अधिकारी -मौजे वढाणे - काळखैरवाडीत 10 वनराई बंधारेच्या माध्यमातून उपलबध पाण्याचे नियोजन केल्यामुळे रब्बी पिकांचे उत्पादन घेण्यास मदत झाली. तालुक्यातील कोरडवाहू क्षेत्रातील शेतकऱ्यांनी लोकसहभगातून असे प्रकल्प राबविणे गरजेचे आहे.  यासाठी कृषि विभागाचे  पूर्ण सहकार्य राहील.