Jalna Crime News : जालना जिल्ह्यातील (Jalna District) अंबड तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, शेती नावावर करून देत नसल्याने सावत्र भावानेच आठ वर्षाच्या भावाचा गळा आवळून खून (Murder) केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. अंबड तालुक्यातील भार्डी येथे ही घटना असून, या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विराज कुढेकर (वय 8 वर्षे) असे खून झालेल्या मुलाचे नाव असून, ऋषिकेश तुकाराम कुढेकर व रेखा तुकाराम कुढेकर (रा. रांजणगाव, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपींचे नावं आहेत. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड तालुक्यातील भार्डी येथील तुकाराम कुढेकर यांना दोन पत्नी आहेत. त्यांची पहिली पत्नी छत्रपती संभाजीनगर शहरात राहत असून, ऋषिकेश कुढेकर (18 वर्षे) हा मुलगा आहे. तर त्यांची दुसरी पत्नी कावेरी या तुकाराम कुढेकर यांच्यासोबत राहत असून, त्यांना विराज कुढेकर व एक मुलगी आहे. तुकाराम कुढेकर यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा ऋषिकेश हा छत्रपती संभाजीनगर येथे राहतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो भारडी येथे राहण्यासाठी आला.


आईने दिला होता जीव घेण्याचा सल्ला...


दरम्यान पहिल्या पत्नीचा मुलगा असलेल्या ऋषिकेश याला दोन एकर जमीन नावावर करून पाहिजे होती. त्यामुळे जमीन माझ्या नावावर करून द्या यासाठी तो सतत वडिलांना सांगायचा. मात्र दोन्ही मुलांना समान वाटा म्हणत तुकाराम कुढेकर हे एक एकर जमीन नावावर करून देण्यास तयार होते. परंतु एक एकर जमीन ऋषिकेशच्या आईला मान्य नव्हती. त्यामुळे तू जर विराजला संपवलं तर सर्व जमिनीचा मालक होशील, असे ऋषिकेशला त्याच्या आईने सांगितले. 


तोंडात, नाकात माती व चिखल टाकला 


आईने दिलेला सल्ला ऋषिकेशच्या डोक्यात बसला होता. त्यामुळे त्याने आपला सावत्र भाऊ विराज कुढेकर याला संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्याने गुरुवारी विराज कुढेकरला उसाच्या शेतात घेऊन गेला. शेतात गेल्यावर संशयित ऋषिकेशने विराज चा गळा आवळून खून केला. तसेच त्याने ओरडू नयेत म्हणून, त्याच्या तोंडात, नाकात माती व चिखल टाकला होता. दरम्यान याची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांनी तत्काळ याबाबत पोलिसांना कळवले. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी कावेरी कुढेकर यांच्या फिर्यादीवरून गोंदी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी संशयित ऋषिकेश तुकाराम कुडेकर व त्याची आई रेखा तुकाराम कुडेकर यांना अटक करून न्यायालयासमोर हजार केले असता, न्यायालयाने त्यांना 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या : 


समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादनात एक हजार कोटींचा घोटाळा; आमदार गोरंट्यालांचा आरोप