Corona Vaccine Pune : राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये (Corona) सातत्याने वाढ होत आहे. त्यात ठाणे, पुणे आणि मुंबईत कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहेत. मात्र कोरोनाचे सक्रिय रुग्ण सर्वाधिक असूनही पुणे महापालिकेच्या एकाही रुग्णालयात लस उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाा प्रदुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचं आहे. मात्र पुण्यात लसीचा तुटवडा आहे. त्यामुळे पुणेकरांना लसीसाठी वणवण फिरावं लागत आहे. 


पुणे मनपाच्या रुग्णालयात लसी उपलब्ध नाही, लसीकरण बंद


नायडू रुग्णालय, कमला नेहरु, ससून हॉस्पिटल, सुतार दवाखाना यासारखा महानगरपालिकेच्या रुग्णालयात लस उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले आहे. लसींचा साठाच नसल्यामुळे पुण्यातील महानगरपालिकेतील लसीकरण बंद करण्यात आले आहे. मार्च महिन्यापासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना पुण्यात मात्र लसीकरण बंद असल्याने नागरिकांना मात्र सहन करावा लागत आहे. पुणे महानगरपालिकेच्या रुग्णालयात सध्या लसी उपलब्ध नसल्यामुळे हे लसीकरण थांबवले आहे. पुढील 8 दिवसात कोरोना प्रतिबंधक लस या रुग्णालयात उपलब्ध होतील आणि लसीकरण सूर होईल. सध्या पुणे शहरात परिस्थिती नियंत्रणात असून प्रशासन खबरदारी घेत आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ भगवान पवार यांनी दिली आहे. त्यामुळे पुणेकरांना लसीसाठी किमान 8 दिवस वाट बघावी लागणार आहे. 


8 दिवसात लस उपलब्ध होणार...


या सगळ्या रुग्णालयात पुणेकर लसीकरणासाठी येत आहेत. मात्र त्यांना लसीकरणाविनाच परतावं लागत आहे. अनेक लोक रुग्णालयात लसीसंदर्भात चौकशी करायला येत आहेत. मात्र लस 8 दिवसात उपलब्ध होईल, असं नागरिकांना सांगण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाचा आलेख घसरला होता. पण, आता पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने वेग पकडला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच आठवड्यात देशातील कोरोना संसर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मंत्रालयाने राज्यांना कोविडचा सामना करण्यासाठी चार T म्हणजेच टेस्ट-ट्रॅक-ट्रीट-टीकाकरण (लसीकरण) करण्याचा सल्ला दिला आहे. केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक तत्वेही जारी केली आहेत.


घाबरु नका, खबरदारी बाळगा


कोरोनाचा वाढता धोका पाहता गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन नीती आयोगाने केलं आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, असं आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात येत आहे. घाबरुन जाणू नका, तर खबरदारी घ्या, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.