Maharashtra Solapur News: छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) भूरळ अवघ्या पडली आहे. महाराजांचे दिसणं, महाराजांचं राज्य, महाराजांचे किल्ले, महाराजांचे प्रशासन याबाबत जगातील भल्याभल्या जागतिक नेत्यांनाही आकर्षण असल्याचं आपण नेहमी ऐकत असतोच. अशाच एका शिवभक्ताची चर्चा रंगलीये. हा पठ्ठ्या मुळचा केरळचा. पण दुबईत नोकरी करत होता. सोशल मीडियात महाराजांबाबत वाचलं. महाराजांचा पराक्रम, गड-किल्ले, इतिहास जाणून घेण्याची त्याच्या मनात इच्छा निर्माण झाली. मग काय? पठ्ठ्यानं थेट नोकरीचा राजीनामा दिला आणि केरळ गाठलं.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेले गड-किल्ले तरी पाहू म्हणून त्यानं दोन महिने सायकल चालवण्याचा पण केला. सायकलवरुन संपूर्ण महाराष्ट्रातील गड-किल्ले फिरण्याची त्याची योजना होती. 1 मे 2022 रोजी त्यानं केरळ सोडलं. एम. के. हमरास असं या महाराजांच्या अनोख्या शिवभक्ताचं नाव आहे.
गेले अकरा महिने सातत्यानं त्यानं 8500 किलोमीटरचा प्रवास सायकलनं केला आहे. आत्तापर्यंत 165 किल्ले फिरून त्यानं अभ्यास केला आहे. महाराजांनी उभारलेले सर्व 370 किल्ले बघण्याचा त्याचा मानस असून सर्वात शेवटी शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर जाणार असल्याचं हमरास सांगतो. आज तो करमाळा येथे पोचल्यावर करमाळ्यात मराठा फोर्ट आणि दुर्ग भ्रमंतीच्या कार्यकर्त्यांनी त्याचं स्वागत केलं. करमाळ्यात भुईकोट किल्ल्याला देखील तो भेट देणार असल्याचं दुर्ग मंडळाचे अध्यक्ष राहुल पवार यांनी सांगितलं.
श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम आणि अलौकीक कार्य याची केरळमध्ये आम्हाला एवढी माहीत नव्हती. मात्र जेव्हा भारतातील राज्यांचा इतिहास गुगलवर सर्च केला त्यावेळी छत्रपती आणि त्यांचे किल्ले याची माहिती समोर आली. महाराजांचा इतिहास वाचून अनोखी प्रेरणा मिळाल्यानंच आपण जीवनात येऊन किमान महाराजांच्या इतिहासाला किमान भेट तरी द्यावी, या प्रेरणेतून सायकल प्रवासाला सुरुवात केल्याचं हमरास सांगतो. एम. के. हमरासचे शिक्षण बी. कॉम पर्यतचे शिक्षण घेतले असून तो सौदी अरेबिया आणि दुबई येथे वाहनचालकाचं काम करत होता. त्यानं 1 मे 2022 पासून सायकलवरून गड किल्ल्यांच्या प्रवास सुरु केला. 11 महिन्यात तब्बल 8 हजार 550 किलोमीटरचा प्रवास करत 165 किल्ल्यांना भेटी दिल्या आहेत. या प्रवासादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे, संभाजीराजे, शिवेंद्रराजे आणि शिवप्रेमींनी मदतीचा हात दिला आहे. केरळमधील बेकिल किल्ल्यापासून त्यानं प्रवासास सुरुवात केली आहे. सायकलवरून एकटा प्रवास करत असताना असंख्य अडचणी आल्या, मात्र छत्रपतींचा वारसा असणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांनी आत्तापर्यंत माझ्या सर्व अडचणी दूर केल्याचं हमरास अभिमानानं सांगतो. वर्षानुवर्ष महाराष्ट्रात राहून आपण महाराजांचा कोणता आदर्श पहिला असे प्रत्येक मराठी माणसाला विचार करायला लावणारी मोहीम हमरास पूर्ण करत आहे. शिवरायांच्या या शिवभक्ताला एबीपी माझाचाही मानाचा मुजरा!
महत्त्वाच्या इतर बातम्या :