Pune PMPML Bus :  मागील काही दिवसांपासून PMPML बसचे पराक्रम समोर येत आहे. त्यातच आता पुण्यात मद्यधुंद अवस्थेत PMPML  चालवून अनेकांचा जीव धोक्यात टाकल्याची घटना समोर आली आहे. PMPML थेट नो एन्ट्रीमध्ये चालवल्याने बसचा लहान अपघातदेखील झाला आहे. हडपसर, काळेपडळ येथील फराटे चौक येथे ही घटना घडली आहे. बसमधील दोन तरुणांनी प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. त्यामुळे पुणे PMPML च्या सुरक्षिततेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे आहे.


नेमकं काय घडलं?


हडपसर, काळेपडळ येथील फराटे चौक, रेल्वे क्रॉसिंग जवळ मद्यधुंद अवस्थेत असलेल्या वाहनचालकाने प्रवासी बस रस्त्याच्या विरुद्ध दिशेने नेल्यामुळे अपघात झाला. या बसचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. हे पाहून दोन तरुणांनी प्रसंगावधान रोखत बसगाडी वर ताबा मिळवत गाडी बाजूला घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला.  वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळल्यामुळे गणेश काळसाईत, मयुर बोराडे या दोन तरुणांनी हे धाडस केले. यांनतर हडपसर शिवसेनेचे नितीन गावडे यांनी डेपो मॅनेजर अत्तार यांच्याशी संपर्क साधला असता गाडी आणि वाहनचालक हा कंत्राटदारांकडून असल्याचे समजलं आहे. 


PMPML प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह?


मागील काही दिवसांपासून पुणे PMPML च्या बस अपघातात वाढ झाली आहे. चालकांचं नियंत्रण सुटून हे अपघात झाल्याचं समोर आलं आहे. पुण्यात हजारो लोक रोज PMPML बसने प्रवास करतात. त्यातच असा हलगर्जीपणा जर PMPML बस चालकांकडून होत असेल तर नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार PMPML प्रशासनाला नसल्याचं बोललं जात आहे. या सगळ्यांत जर कोणती जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण?, असाही प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. 


 बसला चावी लावून होती; चोरानं थेट बसच पळवली...


काही दिवसांपूर्वी PMPML बस चोरी गेल्याचा प्रकार समोर आला होता. सारसबाग परिसरात PMPL ची बस लावण्यात आली होती. सध्या पुण्यात पालखी सोहळ्यामुळे बस लावायला जागा मिळत नाही. त्यामुळे पुलगेट आगाराची बस सारसबागेजवळ लावली होती. त्यानंतर ड्रायव्हरनं बसमध्येच चावी ठेवली, नेमकं हेच चोरानं पाहिलं आणि थेट बसच पळवून नेली होती. या प्रकारामुळे सगळीकडे खळबळ उडाली होती. बस चोरी केली आणि चोरानं बस मार्केट यार्ड परिसरात सोडली आणि चोर पसार झाला होता. त्यानंतर चोरानं बसमधील 5000 रुपयांची बॅटरी चोरून नेल्याचं उघडकीस आलं होतं. या संपूर्ण घडल्या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.