Pune Metro News : पुण्याची मेट्रो पुणेकरांसाठी जशी महत्त्वाची (Pune metro) आहे तशीच ती भारतासाठीदेखील महत्त्वाची असणार आहे. पुण्यात देशातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन होत आहे आणि देशातील हेच सर्वात खोल मेट्रो स्टेशन सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशन जवळपास तयार झाले आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त पुढील महिन्यात सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशन आणि ट्रॅकची पाहणी करतील.  सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन, गरवारे कॉलेज ते मेट्रो मार्ग, फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट या मेट्रो मार्गाचे बहुतांश काम अंतिम टप्प्यात आले आहे. उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे, असं महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. 


मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (CMRS) फेब्रुवारी महिन्यात ट्रॅक, स्टेशन आणि प्रवाशांसाठी सुविधांची पाहणी करण्यासाठी येणार आहेत. सीएमआरएसकडून मंजुरी मिळाल्यानंतर पुणे सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशन आणि त्याच्याशी जोडलेल्या मेट्रो मार्गावरील प्रवाशांची वाहतूक सुरू होईल. ही लाईन सुरू झाल्यामुळे स्थानिकांना मोठा फायदा होणार आहे.


मेट्रो स्टेशनची खोली 108 फुटांपेक्षा जास्त आहे.


महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशन आणि त्याला जोडलेल्या सर्व मेट्रो स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आहे. सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशनचे नियोजित काम सुरु आहे. जिथे दोन मार्गिका एकत्र येतात ते काम 95 टक्के पूर्ण झाले आहे. सिव्हिल कोर्ट इंटरचेंज हे एक महत्वाचं स्टेशन असेल. येथे दोन मेट्रो मार्गांमध्‍ये बदल करता येणार आहे. स्टेशनची खोली अंदाजे 31 मीटर (108 फूट पेक्षा जास्त)  आहे. यामध्ये 18 एस्केलेटर आणि आठ लिफ्ट्स बसवण्यात आल्या आहेत. 


सर्वात खोल मेट्रो स्टेशनचे वैशिष्ट्य



सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशनवर कार, बाईक आणि सायकलसाठी पार्किंगची जागा बनवली जात आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) बस टर्मिनस व्यतिरिक्त, अॅग्रीगेटर आणि ऑटोरिक्षांसाठी पिक-अप आणि ड्रॉप-ऑफ पॉइंट्स देखील तयार करण्यात येत आहेत. पाच ये-जा करण्यासाठी मार्ग तयार करण्यात आले आहेत. सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशन कॉम्प्लेक्सला जोडण्यासाठी भुयारी मार्ग बांधला जात आहे. सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशनला हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोच्या तिसऱ्या लाईनशी जोडण्यासाठी फूट ओव्हर ब्रिज बांधण्याची योजना असल्याचे महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.