Pune-Mumbai Highway Accident : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर अपघाचं सत्र सुरुच आहे. आजही पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात झाला आहे. तब्बल 11 वाहनं एकमेकांना धडकली आहे. खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाला आहे. सुदैवाने यात कोणती जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. काही जखमींना रुग्णालयात  दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली होती. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. 


या अपघातात सहा जण जखमी झाले आहे. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एक ट्रकने अकरा वाहनांना धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला. रायगड पोलीस त्याचा शोध घेत आहे. बोरघाट उतरत असताना ट्रकवरील चालकाचा ताबा सुटला असावा अथवा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला असावा असा पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. 


सर्व जखमींना खोपोली नगरपालिका रुग्णालयातून उपचार घेऊन डिस्चार्ज झालेले आहेत. त्यापैकी एक जणाला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी ॲम्बुलन्समधून रवाना केले आहे. या व्यतिरिक्त कोणीही व्यक्ती जखमी नसल्याची माहिती देण्यात आली आहे. कुंदा सोनवने, कमल सोनावने, हर्षदा घाणेकर, सदानंद भोईर, इलेमा आशु, मॅथ्थू थॉमस अशी जखमींची नावं आहेत. यातील मॅथ्थू थॉमस यांना ससून रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर विचित्र अपघातानंतर वाहतूक ठप्पा झाली आहे. घटनास्थळी मदत कार्य सुरु करण्यात आले आहे. या अपघातात 11 वाहनांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे-मुंबई महामार्गावर अपघात वाढत आहेत.


महामार्गाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर


मागील काही दिवसांपासून या महामार्गावर अपघाताचं प्रमाण खूपच वाढलं आहे. मागील काही दिवसांतच किमान किरकोळ अपघात धरुन 5 ते 6 अपघात झाले आहेत. 'हा अपघात झालेल्या ठिाकणी तीव्र उतार आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणारे अवजड वाहनं अनेकदा न्यूट्रलवर वाहन चालवतात किंवा त्यांचे ब्रेक फेल होतात आणि अनेकदा मोठी अवजड वाहनं संपूर्ण लेन व्यापून घेतात. यावर आता अवजड वाहनांसाठी काही नियम लागू करण्यात यावे जेणेकरुन लहान वाहनांनादेखील गाडी चालवण्यासाठी जागा मिळेल. त्यासोबतच वाहनांची आपला वेगदेखील सांभाळण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी सुचना फलक लावलेले आहेत. तीव्र उताराचे देखील सूचना फलक आहेत मात्र या सुचना चालकांनी पाळण्याची गरज असल्याचं रस्ते सुरक्षा तज्ञ तन्मय पेंडसे यांनी सांगितलं आहे.