Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर शहरातील (Chhatrapati Sambhaji Nagar City) मिसारवाडीत एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, हळदीच्या कार्यक्रमात डीजेच्या तालावर नाचण्यावरून दोन गटात तुफान राडा झाला आहे. वाद एवढ्या विकोपाला गेला की, यावेळी झालेल्या दगडफेकीत तिघांची डोकी फुटली. विशेष म्हणजे या घटनेनंतर जखमीसह जवळपास दोनशे जणांचा जमाव सिडको पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. त्यामुळे सिडको पोलिस ठाण्यासमोर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ही घटना मिसारवाडीत बुधवारी (26 एप्रिल) रोजी रात्रीच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की,  शहरातील मिसारवाडी भागातील गल्ली क्र. 5 मध्ये भाऊसाहेब वाघ यांच्या मुलीच्या विवाह समारंभनिमित्ताने बुधवारी हळदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी डीजे लावण्यात आला होता. डीजे असल्याने नाचण्याची धूम सुरु होती.  दरम्यान या भागातील एका गटाचे तरुण देखील डान्स करण्यासाठी मंडपात पोहचले. मात्र त्यांच्या मंडपात येण्याने विवाह समारंभातील लोकांनी आक्षेप घेतला आणि या तरुणांना तेथून जाण्यास सांगितले. त्यामुळे यावरून वादविवाद सुरु झाला. 


थेट मंडपासह परिसरात दगडफेक सुरू झाली...


सुरवातीला शिवीगाळ आणि त्यानंतर पाहता पाहता हा वाद तुंबळ हाणामारीपर्यंत जाऊन पोहचला.  ज्या तरुणांना नाचण्यास विरोध केला, त्यांनी थेट मंडपासह परिसरात दगडफेक सुरू केली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.  यावेळी झालेल्या दगडफेकीत तीन तरुणांची डोकी फुटली असून, ते गंभीर जखमी झाले. दरम्यान अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले. तसेच या घटनेनंतर जवळपास दीडशे जण सिडको पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. यावेळी पोलिसांनी जखमींना तत्काळ घाटी रुग्णालयात पाठवले. तर दोन्ही गटांतील लोकं दारू प्यायलेले होते, आणि डीजेच्या गाण्यावर नाचण्यावरुन वाद झाल्यानंतर त्यांच्यात हाणामारी झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 


पोलीस ठाण्यात मोठा जमाव... 


नाचण्यावरून झालेल्या वादात हाणामारी आणि दगडफेक झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान यावेळी तीन जण जखमी झाले. तर या घटनेनंतर जखमींसह अंदाजे दीडशे लोकांचा जमाव थेट सिडको पोलीस ठाण्यात पोहचला होता. त्यामुळे पोलीस ठाण्यासमोर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Chhatrapati Sambhaji Nagar : विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा प्राध्यापक अखेर निलंबित; पोलिसातही गुन्हा दाखल