Tejas More On Pravin Chavan : विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण खोटे बोलत आहेत. त्यांच्या कार्यालयात घड्याळ आणि त्यामधे छुपा कॅमेरा मी बसवला नाही. परंतु, प्रविण चव्हाण यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. मी घड्याळ बसवले असेल तर प्रविण चव्हाण यांनी तसे पुरावे द्यावेत, असे आव्हान तेजस मोरे यांनी केले आहे.
विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांच्या ऑफिसमध्ये झालेल्या स्टिंग ऑपरेशनबद्दल त्यांनी खुलासा केला आहे. त्यांचे अशील तेजस मोरे यांनी भेट दिलेल्या घडाळ्यातील छुप्या कॅमेऱ्यातून हे स्टिंग ऑपरेशन करण्यात आल्याचा दावा प्रविण चव्हाण यांनी केला आहे. दरम्यान प्रविण चव्हाण यांच्या या आरोपांवर आता तेजस मोरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
प्रविण चव्हाण यांच्या कार्यालयात घड्याळ आणि त्यामधे छुपा कॅमेरा मी बसवला नाही. परंतु, प्रविण चव्हाण यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. मी घड्याळ बसवले असेल तर प्रवीण चव्हाण यांनी तसे पुरावे द्यावेत. विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जारी केलेल्या ज्या व्हिडीओमधे मी उपस्थित आहे, त्यातील प्रत्येक शब्द खरा आहे, असा दावा तेजस मोरे यांनी केला आहे.
'पुणे पोलिसांकडून गिरीश महाजन यांच्याशी संबंधित भोईटे यांच्या घरी बनावट पुरावे प्लांट'
तेजस मोरे म्हणाले, "प्रविण चव्हाण यांनी मला जामीन मिळवून दिला आहे. त्यामुळे मी त्यांना देव मानत होतो. त्यानंतर मी त्यांना त्यांच्या कार्यालयात मदत करु लागलो. माझे इंग्रजी चांगले असल्यामुळे विविध खटल्यातील जबाब ते सांगतील त्या पद्धतीने मी इंग्रजीत टाईप करून देत होतो. अनेक खटल्यांचे जबाब मी नोंद केले आहेत. भाजप नेते गिरीश महाजन यांच्या प्रकरणाशी संबंधित जबाब देखील मी नोंद केले आहेत. परंतु, पुणे पोलीस गिरीश महाजन यांच्याशी संबंधित भोईटे यांच्या घरी छापा टाकण्यासठी गेल्यापासून माझे मतपरिवर्तन झाले. कारण पुणे पोलिसांकडून भोईटे यांच्या घरी बनावट पुरावे प्लांट करण्यात आले होते. तेव्हापासून मी प्रविण चव्हाण यांच्यापासून दूर गेलो, असा गौप्यस्फोट तेजस मोरे यांनी केला आहे.
"जळगावला गेलेल्या पुणे पोलिसांच्या जेवणाचे बील देखील मी गुगल पे वरुन भरले आहे. प्रविण चव्हाण यांच्या सांगण्यावरून पुणे पोलिसांकडून बनावट पुरावे तयार करुन ते भोईटेंच्या घरात प्लांट करण्यात आले. काहीही करुन गिरीश महाजन यांना मोक्का लावण्याचा पुणे पोलिसांचा प्रयत्न होता, असा खुलासा तेजस मोरे यांनी केला आहे.
"गिरीश महाजन यांना अडकवण्यासाठी आधी अनिल देशमुख आणि नंतर एकनाथ खडसे प्रविण चव्हाण यांना सांगत होते. मी गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना कधीच भेटलेलो नाही. प्रविण चव्हाण हे मला खोट्या गुन्ह्यात अडकवतील ही भीती आहे. त्यामुळे मी लवकरच माध्यमांसमोर प्रत्यक्षात येणार असल्याची माहिती तेजस मोरे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या