पुणे : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून पुण्यात वाहतूक पोलिसांनी हेल्मेटसक्ती लागू केली. हेल्मेटसक्तीला पुणेकरांकडून मोठ्या प्रमाणात विरोध सुरु आहे. याबाबत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. बापट याबाबत म्हणाले की, "हेल्मेट नसलेल्या नागरिकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करताना दंड आकारु नये, त्यऐवजी पोलिसांनी व्यावहारिक मार्ग अवलंबायला हवा."

गिरीश बापट म्हणाले की, "पुण्यातील गल्लीबोळातून, अरुंद रस्त्यांवरून दिवसभर वाहनांची रेलचेल असते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकी असतात. अनेक महिला मुलांना शाळेत सोडायला जात असतात. तेव्हा वाहनांचा वेग कमी असतो. अशावेळी हेल्मेट नसल्यास पोलिसांनी दंड न आकारता व्यावहारिक मार्ग अवलंबवावा. प्रामुख्याने लोकांच्या प्रबोधनावर भर द्यावा."

महामार्गांवरील वाहतुकीबाबत बोलताना बापट म्हणाले की, राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा वेग खूप जास्त असतो. मागील वर्षभरात एकट्या पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातात 275 वाहनचालकांचा डोक्याला मार लागल्यामुळे मृत्यू झाला. त्यामुळे महामार्गांवर हेल्मेटसक्ती व्हायलाच हवी. वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ते गरजेचे आहे.

हेल्मेटसक्ती हा कोर्टाचा निर्णय आहे. कोर्टाच्या निर्णयाविरोधात आपण जाऊ शकत नाही. कोर्टाचा निर्णय हा कायदा असतो. त्यामुळे यावर अधिक चर्चा न करता पुणेकरांनी स्वतःच्या हितासाठी योग्य तो निर्णय घ्यावा, असे आवाहन गिरीश बापट यांनी केले आहे.

संबधित बातम्या : 

पुण्यात रिक्षाचालकावर हेल्मेटसक्तीची कारवाई

हेल्मेटसक्तीवरुन पुणेकरांसमोर पोलीस नरमले!

हेल्मेटसक्तीविरोधात पगड्या घालून पुणेकरांचं आंदोलन

हेल्मेटसक्तीची कारवाई, पुणेकरांकडून लाखोंचा दंड वसूल