नाशिक : शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, सातबारा कोरा करा यासह विविध मागण्यांसाठी पुणतांब्यातील शेतकरी पुन्हा एकदा आंदोलन छेडणार आहेत. 15 जानेवारीला म्हणजेच मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर पुणतांब्याच्या मुक्ताई ज्ञानपीठात मशाल पेटवत सरकारविरोधात आवाज उठवला जाणार आहे.


आज नाशिकच्या आडगाव नाका परिसरातील एका मंगल कार्यालयात किसान क्रांती समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पुणतांब्यासह औरंगाबादमधील काही शेतकरी सहभागी झाले होते. गेल्यावर्षी पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी संप पुकारत देशाचे लक्ष वेधून घेतले होते.


त्यावेळी सरकारने दिलेली आश्वासनं अद्याप पूर्ण केली नसल्याने शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यामुळे हे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता कोअर कमिटीचे सदस्य जयाजी सूर्यवंशी यांनी व्यक्त करत सरकारला इशारा दिला आहे


सरकारविरोधात दोन हात करण्याचा निर्णय झाला आहे. सरकार शेतकऱ्यांना फसवण्यात यशस्वी झालं आहे. मागीलवेळी केलेलं आंदोलन फार तीव्र नव्हतं, मात्र यावेळी तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत. तसेच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांना मासिक वेतन देण्याची घोषणा शेतकऱ्यांना मुर्ख बनवायचा प्रयत्न असल्याचं शेतकरी नेते जयासी सूर्यवंशी यांनी केला.