अंबरनाथ : भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या पैलवानांच्या नादी लागू नये, अशा शब्दात शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला आव्हान दिलं आहे. मित्रपक्षांना धूळ चारण्याबाबत अमित शाहांनी केलेल्या वक्तव्याला गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिलं.


अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या पैलवानांच्या नादी लागू नये, कधी आडवा पाय टाकतील आणि लांब करतील समजणार पण नाही. महाराष्ट्र हे दिल्लीवर राज्य करणारं 'राज्य' आहे, असं म्हणत गुलाबरावांनी शाहांनी आव्हान दिलं. युती होगी तो ठीक, नहीं तो पटक देंगे या अमित शहांच्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला.

'शिवसेना आणि अकाली दल हे भाजपचे सगळ्यात जुने मित्रपक्ष आहेत. पण दोस्त ही बेईमान हो गया तो करे क्या?' असा सवाल अंबरनाथमध्ये आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी केला.

पाच राज्यांच्या निकालानंतर भाजपचं अवसान गेलं आहे. भारतीय जनतेने त्यांना जागा दाखवायला सुरुवात केली आहे. या परिस्थितीत लोकसभेच्या महाराष्ट्रात 40 जागा जिंकण्याची वल्गना करुन भाजपने आपली ईव्हीएमशी युती होणार हे जाहीर केलं आहे, अशी टीका शिवसेनेने केली होती.

काय म्हणाले होते अमित शाह?


आगामी निवडणुकीत भाजपसोबत न जाण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेला अमित शाह यांनी सडेतोड उत्तर दिलं होतं. युती होगी तो साथी को जितायेंगे, नही हुई तो पटक देंगे, अशा शब्दात अमित शाह यांनी भाजपची भूमिका मांडत एकप्रकारे शिवसेनेला इशारा दिला होता.


शिवसेनेसोबत युतीबाबतच्या कन्फ्युजनमधून (संभ्रम) कार्यकर्त्यांनी बाहेर पडावं. मित्रपक्ष सोबत आला तर त्यांना जिंकवू अन्यथा त्यांचाही पराभवाची धूळ चारु. त्यासाठी प्रत्येक बूथवर तयारी सुरु करा, विजय आपलाच होईल, अशा सूचना अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. स्वबळावर निवडणुका लढवून भाजप 48 पैकी किमान 40 जागा जिंकेल असा दावाही अमित शाहांनी केला होता.



संबंधित बातम्या


अंगावर येणाऱ्याला शिंगावर घ्यायला तयार, अमित शाहांच्या वक्तव्याला शिवसेनेचं उत्तर


युती होगी तो ठीक, नही हुई तो पटक देंगे : अमित शाह