Pune Crime news : नासा, इस्रो, यासारख्या संशोधन (Pune crime news) संस्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या धातूच्या व्यवसायात गुंतवणूक करून मोठा लाभ मिळवण्याचे आमिष दाखवून चार जणांच्या टोळीने पुण्यातील 250 हून अधिक लोकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यात 5 ते 6 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. नासा, इस्रोमध्ये वापरत असलेल्या राइस पुलर यंत्राच्या विक्रीतून भरपूर मालामाल व्हाल, असे सांगत पुण्यातील 250 पेक्षा अधिक लोकांना लावला चुना लावला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे स्टेशन परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या चारही आरोपींनी गुंतवणूकदारांसाठी एक बैठक बोलावली होती आणि त्यात एका मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन देखील केले. अमेरिकेच्या संशोधन संस्था 'नासा’ मधील लोकं भारतात येणार आहेत. यावेळी शास्त्रज्ञ राइस पूलर या यंत्रावर संशोधन होणार आहे. तसेच राइस पूलर या धातूच्या भांड्याला मागणी संपूर्ण जगात असल्यामुळे आरोपींनी गुंतवणूकदारांना 1 लाख गुंतवले तर 1 कोटी मिळतील अशी बतावणी केली होती. इतकंच काय तर या आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार करून नागरिकांकडून पैसे जमा केले.यात पुण्यातील 250 हून अधिक लोकांची जवळपास 6 कोटी रुपयाची फसवणूक झाली असल्याची माहिती, पोलिस उपायुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) श्रीनिवास घाडगे यांनी दिली आहे.


या प्रकरणी राम गायकवाड, रामचंद्र वाघमारे, संतोष सकपाळ, राहुल जाधव यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बंडगार्डन पोलिस ठाण्यात या सगळ्यांच्या विरोधात विविध कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून या सगळ्यांचा शोध सुरू केला आहे आणि त्यासाठी पथकं तयार करण्यात आली आहेत.


काय आहे राइस पुलर?
कॉपर इरेडियम हा एक प्रचीन धातू आहे. या मौल्यवान धातूची क्षमता शोधण्यासाठी राइस पुलिंग या चाचणीचा वापर केला जातो. या प्रक्रियेत तांदूळ एका बाजूला ठेवून समोर कॉपर इरेडियम धातूची वस्तू ठेवली जाते. ही वस्तू तो तांदूळ किती अंतरावरून खेचून घेते, यावर या वस्तूची किंमत ठरते. जितक्या जास्त लांबीवरून तांदूळ खेचला जाईल तितकी जास्त किंमत मिळते. यालाच राइस पुलिंग म्हणतात.


आमिषाला बळी पडू नका; पोलिसांचं आवाहन
पुण्यात अशा अनेक टोळ्या सक्रीय आहे. अनेक प्रकारचं आमिष दाखवून पैसे उकळल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, असं आवाहन पुणे पोलिसांनाकडून करण्यात आलं आहे.