Pune Crime News : पुण्यातील एका 64 वर्षीय महिलेला लग्नाचे स्वप्न पाहणे चांगलेच महागात पडले. या महिलेसोबत एकाने सोशल मीडियावर (Social Media) मैत्री केली. त्यानंतर लग्नाचं अमिष दाखवलं आणि वेगवेगळ्या कारणाने तिच्याकडून तब्बल 57 लाख 79 हजार (Crime News) रुपये उकळले. ही घटना डिसेंबर 2021 ते जून 2022 या कालावधीत घडली आहे. सायबर पोलीस ठाण्यात या महिलेने तक्रार दिली आहे. त्यावरून सहा मोबाईल धारक आणि बँकेचे खातेधारक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार या गर्भ श्रीमंत आहेत.
पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात त्या एकट्याच राहतात. त्यांची आणि आरोपीची व्हाट्सअपद्वारे ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्याने इरीक ब्रॉन असे नाव सांगितले होते. तो परदेशात असल्याचेही तो म्हटला. त्यानंतर त्याने त्यांच्याशी गप्पा मारून त्यांना लग्न करण्याचे देखील आमिष दाखविले. महिलेचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर त्यांना बँक खात्यात दोन करोड रुपये पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.
नेमकं काय सांगण्यात आलं?
माहितीनुसार, नागरिक या 64 वर्षीय महिलेला रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियातून बोलत असल्याचे सांगत आशा कुमारी नावाच्या महिलेने संपर्क केला. त्या महिलेची खात्री पटावी म्हणून रिझर्व्ह बॅंकेशी साधर्म्य असलेला एक मेल देखील पाठवण्यात आला. आम्ही पैसे पाठवणार आहोत पण त्यासाठी बॅंक खात्यात काही पैसे जमा करावे लागतील, असं महिलेला सांगण्यात आलं. महिलेला 57 लाख 79 हजार 300 रुपये बॅंक खात्यात जमा करण्यास सांगण्यात आलं. महिलेने पैसे पाठवल्यानंतर त्यांना दोन कोटी रुपयांची रक्कम पाठवण्यात आलीच नाही. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे तपास करत आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सायबर चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. लोन अॅपच्या माध्यमातून देखील अनेकांना गंडा घालण्यात येत असल्याचे समोर आलं आहे. पुण्यातील अनेक ज्येष्ठ नागरीकांना टार्गेट करुन त्यांच्याकडून लाखो रुपये चोरट्यांकडून लुबाडण्यात आले आहेत. त्यामुळे कुठल्याही अनोळखी व्यक्तीच्या भुलथापांना बळी न पडण्याचं आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सायबर गुन्ह्याचं सत्र संपेनाच...
पुण्यात बंटी-बबली जोडीने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. खानदेशची लोकप्रिय कलाकार दिपू क्वीन (Deepu Queen) आणि तिच्या प्रियकराने तात्काळ लोन मिळवून देतो, असं सांगून नागरिकांची लाखो रूपयांची फसवणूक केली होती. स्वारगेट पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून हेमराज बावसार आणि दिपाली पौनीकर उर्फ दिपू क्वीन यांना अटक होती. या बंटी बबलीच्या जोडीने तब्बल दीडशे जणांना गंडा घातल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.