Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने आठवडाभरात दुसऱ्यांदा हाहाकार केला. गुरुवारी सायंकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. या पावसाने अनेक ठिकाणी दाणादाण झाली. जिल्ह्यात सोयाबीन आणि भात कापणीला वेग आला असतानाच परतीचा पाऊस दणका देत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. जयसिंगपूर, इचलकरंजी तसेच असळज-गगनबावडा भागामध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाला. कुंभी नदीवरील रेव्याचीवाडी, कातळी बंधारे पाण्याखाली गेले. कुंभी धरणातून 600 क्युसेक विसर्ग करावा लागला.
हातकणंगले तालुक्यात वीज पडून दीड एकरातील ऊस जळाला
दुसरीकडे हातकणंगले तालुक्यातील घुणकी गावामध्ये वीज कोसळून दीड एकरातील ऊस जळाला. येथील दत्त मंदिराशेजारी वीज कोसळल्याने दीड एकरातील ऊस जळून खाक झाला. गावाजवळील दत्त मंदिर शेजारी वीज कोसळल्यानंतर उसाने पेट घेतला. गावातील ओढ्यातील पाणी कूपनलिकांच्या सहाय्याने पेटलेल्या ऊस क्षेत्रावर पाणी मारल्याने आग आटोक्यात आली. त्यानंतर आलेल्या पावसाने आग आटोक्यात आली. वीज पडून ऊस जळाल्याने राज्य शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पीडित शेतकऱ्यांनी केली आहे.
असळज, गगनबावडा परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस
गगनबावड्यासह तालुक्यातील असळजमध्येही परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. पावसाने कुंभी नदीवरील रेव्याचीवाडी, कातळी बंधारे पाण्याखाली गेले. कुंभी धरणातून 600 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. असळजमध्ये पावसाने थैमान घातले. डी. वाय. पाटील कारखान्याच्या पर्जन्यमापक केंद्रात दुपारी तीन ते साडेपाच या अडीच तासात 53 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे कोल्हापूर – गगनबावडा मार्गावरील असळज, सांगशी येथे गटारी तुंबून गटारीचे पाणी रस्त्यावर आले.
कुंभी जलाशयाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज सायंकाळी पाचपासून धरणातून 600 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे कुंभी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या