Pimpari Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडमधील वेब पोर्टलच्या (Pimpari chinchwad news) पत्रकाराने प्रेयसीला जीवे मारण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याचं आणि तिची नदी पात्रात विल्हेवाट लावल्याचं तपासात समोर आलंय. 2 नोव्हेंबरला या पत्रकाराने प्रेयसी हरवल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर या प्रकरणात उलट तपासणी झाली अन् पत्रकारालाच पोलिसांनी अटक केली. रामदास तांबे असं या पत्रकाराचे नाव असून प्रेयसीचं चंद्रमा मुनी असं नाव होतं. 


रामदासवर भोसरी पोलिसांनी भा.द.वि कलम 364 प्रमाणे गुन्हा दाखल केलाय. पत्रकार रामदास हा अहमदनगर जिल्ह्यातील आहे तर प्रेयसी चंद्रमा ही ओरिसाची होती. गेली दोन वर्षे ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र चंद्रमा ही तिच्याच वडिलांशी नेहमी वाद घालायची. स्वतःच्या वडिलांनी दोन पैकी एक घर तिच्या (चंद्रमा) नावावर करावं, तसेच रोख रक्कम आणि दागिने ही द्यावेत यासाठी ससेमिरा लावायची. 


स्वतःच्या वडिलांकडून हे मिळावं म्हणून ती प्रियकर पत्रकार रामदासच्या नावाचा वापर करायची. मात्र हे रामदासला नेहमीच खटकायचं. यावरूनच त्यांच्यात नेहमी खडाजंगी व्हायची. यासाठी जर मदत केली नाही तर प्रियकर पत्रकाराला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची ती धमकी द्यायची. म्हणून रामदासने तिच्यापासून कायमची सुटका मिळवायचं ठरवलं. यासाठी 13 ऑगस्टला भोसरीतील राहते घरातून जीवे ठार मारण्याचा उद्देशाने प्रेयसी चंद्रमाचे अपहरण केले. तिथून खेड तालुक्यातील केळगावला नेहले आणि तिथल्या नदीपात्रात तिची विल्हेवाट लावली. असं तपासात निष्पन्न झाल्याची फिर्याद पोलीस नाईक लक्ष्मण डामसे यांनी दिली. 


13 ऑगस्टच्या या घटनेनंतर पत्रकार रामदासने थेट 2 नोव्हेंबरला प्रेयसी चंद्रमा हरविल्याची तक्रार दिली. सुरुवातीला मिसिंगचं वाटणाऱ्या प्रकरणाने 4 नोव्हेंबरला वेगळं वळण घेतलं आणि भोसरी पोलिसांनी रामदासलाच ताब्यात घेतलं. मिसिंगची तक्रार दिल्यापासूनच त्याच्यातला खोटेपणा पोलिसांना दिसून येत होता. चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतरही मी असं काही केलं नाही असंच तो म्हणत होता. मात्र पोलिसांनी त्याच्यासमोर उपस्थित केलेल्या प्रश्नामुळं तो अनुत्तरित राहिला अन् शेवटी त्याने कबुली दिली. मात्र अद्याप भोसरी पोलिसांच्या हाती मृतदेह लागलेला नाही, त्याच शोधासाठी आज पोलिसांनी न्यायालयाकडे कोठडी मागितली. यावर न्यायालयाने नऊ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत.


ही बातमी देखील वाचा